‘मातोश्री’ला धक्का; भाजपाचा इरादा पक्का
By Admin | Updated: August 30, 2014 02:36 IST2014-08-30T02:36:48+5:302014-08-30T02:36:48+5:30
मातोश्रीवर जाऊन मनधरणी करण्याचा अडवाणी व मुंडे यांनी पाडलेला प्रघात आता मोडीत काढण्याचा इरादा राजधानीतील भाजपा नेत्यांनी पक्का केला आहे

‘मातोश्री’ला धक्का; भाजपाचा इरादा पक्का
रघुनाथ पांडे, नवी दिल्ली
मातोश्रीवर जाऊन मनधरणी करण्याचा अडवाणी व मुंडे यांनी पाडलेला प्रघात आता मोडीत काढण्याचा इरादा राजधानीतील भाजपा नेत्यांनी पक्का केला आहे. वाटाघाटीत सुटणाऱ्या अधिकाधिक जागा जिंका आणि मुख्यमंत्रिपद ताब्यात घेऊन शिवसेनेला उत्तर द्या, असा स्पष्ट कानमंत्रही नेत्यांना दिला गेला आहे. हरियाणामध्ये हरियाणा जनहित काँग्रेसने राष्ट्रीय लोकशाही आघाडीला सोडचिठ्ठी दिल्यानंतर प्रादेशिक पक्षांबाबत वागताना थोडीशी कठोर भूमिका घेण्याचाही निर्णय घेण्यात आला असल्याचे समजते.
प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, एकनाथ खडसे, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे हे या निवडणुकीतील उमेदवार व ते कोअर समितीचे सदस्यही असल्याने त्यांचा शिवसेनेशी फार संबंध न ठेवता राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांशी शिवसेनेचा संपर्क ठेवण्याचेही नियोजन होत आहे. जागावाटपाआधी त्याला अंतिम रूप येईल. याच पायरीतील एक टप्पा म्हणजे, माजी अध्यक्ष राजनाथसिंग व त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे विश्वासू असलेले राजीव प्रताप रूडी हे राज्याचे प्रभारी असताना त्यांचे पंख छाटत अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या मर्जीतील राजस्थानचे प्रदेशाध्यक्ष ओमप्रकाश माथुर यांना राज्याचे निवडणूक प्रभारी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खास असलेले राष्ट्रीय सहसंघटनमंत्री व्ही. सतीश यांना निवडणूक संपेपर्यंत राज्यात मुक्कामी ठेवून भाजपाने नवी खेळी खेळली आहे. सूत्रांनी असे सांगितले, की रूडी यांना बदलण्याची शक्यता असून, त्यासाठी मुहूर्त व घटना शोधण्याचे काम सुरू आहे. व्ही. सतीश मूळचे नागपूरचे, सध्याचे प्रदेश संघटनमंत्री रवी भुसारीही नागपूरकर, असे चित्र वरवर दिसत असले तरी त्यांची मुळे खोलवर रूतल्याचे जाणकारांचे मत आहे.
बिहार, उत्तराखंड, कर्नाटकातील पोटनिवडणुकींच्या निकालानंतर व त्यापाठोपाठच्या हरियाणाप्रकरणानंतर शिवसेनेने भाजपाशी असलेला व्यवहार अधिक ताठर केला असला तरी, त्याचे कोणतेच पडसाद दिल्लीत उमटलेले नाहीत.