पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफ जवान पूर्णम कुमार शॉ अनावधानाने आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचले. वीस दिवसांनंतर पाकिस्तानी रेंजर्सनी त्यांतची सुटका केली आणि भारताच्या स्वाधीन केलं. आता पाकिस्तानमध्ये त्यांच्यासोबत नेमकं काय घडलं? किती क्रूरतेने वागलं गेलं हे आता पूर्णम कुमार शॉ यांनी सांगितलं आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बीएसएफ जवान पूर्णम कुमार शॉ हे पाकिस्तानच्या ताब्यात असताना त्यांच्यासोबत क्रूरपणे वागण्यात आलं. खूप त्रास सहन करावा लागला. त्यांना दात घासण्याची परवानगी नव्हती. त्यांना झोपू दिलं नाही. टॉर्चर केलं. त्यांचा फक्त शारीरिक छळ करण्यात आला नाही तर मानसिक छळही करण्यात आला. त्यांना तीन ठिकाणी नेण्यात आलं. विमानांच्या उडण्याचा आवाज ऐकू यावा म्हणून त्यांना एअरबेसजवळही नेण्यात आलं.
पूर्णम कुमार शॉ हे १६ वर्षांपासून बीएसएफमध्ये आहे. त्यांची नुकतीच फिरोजपूर येथे पोस्टिंग झाली होती. आयबीमध्ये नियुक्त असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबद्दलही त्यांची चौकशी करण्यात आली. बहुतेक वेळा त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधून त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी नेलं जात असे. एका ठिकाणी त्यांना जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. त्यांना शिवीगाळ करण्यात आली.
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
पूर्णम कुमार शॉ यांना पाकिस्तान रेंजर्सनी पकडलं. तेव्हापासून त्यांचं कुटुंब खूप चिंतेत होतं. ते पूर्णम यांच्या परत येण्याची आतुरतेने वाट पाहत होते. पाकिस्तानने आता बीएसएफ जवानाची सुटका केल्यावर ते भारतात परत आले. यामुळे कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. पूर्णम कुमार यांच्या पत्नी रजनी यांनी "माझ्यासाठी खूप मोठा दिवस आहे. सकाळी मला बीएसएफ मुख्यालयातून फोन आला की पूर्णमजी आले आहेत" असं म्हटलं आहे.
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
"२२ दिवसांनी जेव्हा मी त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा सुरुवातीला मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण त्यांची दाढी वाढली होती. पूर्णम यांनी सांगितलं की. काळजी करू नका, मी पूर्णपणे ठीक आहे, माझी मेडिकल टेस्ट देखील झाली आहे. मी जेवल्यानंतर ३ वाजता तुम्हाला फोन करेन. जेव्हा ते घरी येतील तेव्हा मी त्यांना त्यांचे आवडते पदार्थ करून खायला देईन. मी खूप आनंदी आहे. आम्ही आशा सोडून दिली होती" असं रजनी यांनी म्हटलं आहे.