प्युरी, केचअपची मागणी वाढली, टॉमेटॉ महाग झाल्याचा परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 00:55 IST2017-08-02T00:54:56+5:302017-08-02T00:55:28+5:30
टोमॅटोचे भाव गगनाला भिडल्यामुळे टोमॅटो प्युरी आणि केचअपच्या मागणीत ४0 ते ४५ टक्के वाढ झाल्याचे असोचेमने म्हटले आहे.

प्युरी, केचअपची मागणी वाढली, टॉमेटॉ महाग झाल्याचा परिणाम
मंगळूर : टोमॅटोचे भाव गगनाला भिडल्यामुळे टोमॅटो प्युरी आणि केचअपच्या मागणीत ४0 ते ४५ टक्के वाढ झाल्याचे असोचेमने म्हटले आहे. भारतीय स्वयंपाकात टोमॅटोचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. टोमॅटो महागल्यामुळे लोक पर्याय म्हणून टोमॅटो प्युरी आणि केचअपकडे वळले आहेत, असे आढळून आले आहे.
एक किलो टोमॅटोचे दर सध्या १00 रुपयांच्या घरात असल्याने, ते सामान्यांना परवडेनासे झाले आहेत. त्यामुळे लोकांनी आपला मोर्चा टोमॅटो प्युरी आणि केचअपकडे वळविला. दिल्ली-एनसीआर, मुंबई, लखनौ, कोलकता, चेन्नई, अहमदाबाद, हैदराबाद येथील बाजाराचा कानोसा घेतला असता, असे आढळून आले की, टोमॅटोच्या किमती इतक्यात कमी होण्याची शक्यता नाही. अनेक राज्यांत पुरामुळे टोमॅटोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे आवक वाढण्याची शक्यता नाही. त्यामुळे भाव लगेचच कमी होणे अशक्य असल्याचे बाजारातील जाणकारांनी सांगितले.
कांदा आणि बटाटे अनेक दिवस साठवून ठेवता येऊ शकतात. टोमॅटोंचे मात्र, तसे नाही. टोमॅटो आठवडाभरापेक्षा जास्त काळ टिकू शकत नाहीत. त्यामुळे शेतातून काढलेले ताजे टोमॅटो स्वयंपाकघरात वापरले जातात. अत्याधुनिक शीतगृहे आणि वखारीतूनच त्यांची साठवणूक केली जाऊ शकते. या साठवणुकीमुळे किमती आणखी वाढतात. कारण साठवणुकीचा खर्च खूप अधिक असतो. यावर मात करण्यासाठी लोक टोमॅटो प्युरी आणि केचअपकडे वळले आहेत. (वृत्तसंस्था)
हॉटेलांतील डिशेसचे दरही वाढले-
असोचेमने म्हटले आहे की, मागणी वाढल्यामुळे दुकानदारांनी प्युरी आणि केचअपचे साठे वाढविले आहेत. शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही प्रकारच्या रश्श्यांत टोमॅटो वापरला जातो.
च्हॉटेले आणि रेस्टॉरंट्समध्येही टोमॅटोला प्रचंड मागणी असते. टोमॅटो महागल्यामुळे हा सगळा ग्राहक वर्ग प्युरी आणि केचअपकडे वळला आहे. त्याबरोबर, हॉटेलांतील डिशेसचे दरही महागले आहेत.
पुरवठा साखळीकडे लक्ष द्यावे-
फळे आणि भाज्यांच्या किमतींतील सततचे चढउतार लक्षात घेऊन, सरकारने पुरवठा साखळीकडे लक्ष द्यायला हवे. शीतगृहांची निर्मिती करायला हवी.
- डी. एस. रावत, असोचेमचे महासचिव