पंजाबमधील फाजिल्का जिल्ह्यात अज्ञात हल्लेखोरांनी एका व्यावसायिकाची संजय वर्मा यांची गोळ्या घालून हत्या केल्याचे वृत्त आहे. ही घटना अबोहरमधील भगतसिंग चौकात सोमवारी सकाळी दुकानाबाहेर घडली. या घटनेनंतर परिसरात घबराट पसरली. मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात हल्लेखोर मोटारसायकलवरून आले आणि त्यांनी संजय वर्मा यांच्यावर गोळीबार करायला सुरुवात केली, अशी प्राथमिक माहिती आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
संजय वर्मा हे अबोहरमधील द न्यू वेअर वेल टेलर्सचे मालक होते. दरम्यान, अबोहरमधील भगतसिंग चौकात आज सकाळी तीन अज्ञात लोकांनी संजय यांच्यावर गोळीबार केला आणि घटनास्थळावरून पळून गेले. या हल्ल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. याप्रकरणातील आरोपींची ओळख पटवण्यासाठी पोलीस घटनास्थळावरील सीसीटीव्हीची फुटेजची तपासणी करत आहेत. हत्येमागचे कारण अस्पष्ट असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
संजय यांच्या हत्येवरून राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती जंगल राज असल्याचे म्हटले आहे. पंजाबमधील कायदा आणि सुव्यवस्था सर्वात खालच्या पातळीवर पोहोचली आहे. अबोहरमधील द न्यू वेअर वेल टेलर्सचे मालक संजय वर्मा यांची दिवसाढवळ्या झालेली धक्कादायक हत्या ही सध्याच्या जंगल राजाची प्रचलित अवस्था अधोरेखित करते. डॉक्टर, कलाकार आणि खेळाडूंसह व्यावसायिक आणि व्यावसायिकांना खंडणीखोरांकडून गंभीर धमक्या येत आहेत. मी या क्रूर हत्येचा तीव्र निषेध करतो. गुन्हेगारांना तात्काळ अटक करून त्यांना शिक्षा झाली पाहिजे, असे बादल यांनी त्यांच्या एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे.