गरिबीच्या जाणिवेतूनच होते लोकोपयोगी कार्य
By Admin | Updated: September 22, 2014 04:40 IST2014-09-22T04:40:05+5:302014-09-22T04:40:05+5:30
आमदार मंगेश सांगळे गरिबीतून वर आल्याने त्यांना गरिबांच्या, हातावर पोट असलेल्या कष्टकऱ्यांच्या सुख-दु:खाची जाणीव आहे

गरिबीच्या जाणिवेतूनच होते लोकोपयोगी कार्य
मुुंबई : आमदार मंगेश सांगळे गरिबीतून वर आल्याने त्यांना गरिबांच्या, हातावर पोट असलेल्या कष्टकऱ्यांच्या सुख-दु:खाची जाणीव आहे. याच जाणिवेतून त्यांनी लोकोपयोगी कार्य केलेले आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांनी केले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार सांगळे यांच्या ‘लढा नवनिर्माणाचा’ या पुस्तकाचू प्रकाशन काल सिंधूताई यांच्या हस्ते विक्रोळीतील कन्नमवार नगरातील कामगार कल्याण मंडळाच्या सभागृहात पार पडले. विक्रोळी मतदारसंघात अतिशय चांगले काम करणाऱ्या सांगळे यांच्यासारख्या गुणी लोकप्रतिनिधींच्या मागे जनतेने उभे राहिले पाहिजे, असे सिंधूताई सिंधूताई सपकाळ यांनी या वेळी सांगितले.
समर्थ चॅरिटेबल ट्रस्टने आयोजित केलेल्या या सोहळ्यात मनसेचे सरचिटणीस आमदार बाळा नांदगावकर, ज्येष्ठ विचारवंत पद्मश्री मुजफ्फर हुसेन, ज्येष्ठ साहित्यिक वामन होवाळ, वागीश सारस्वत आदी मान्यवर उपस्थित होते. विधानसभेत मांडलेले मुद्दे आणि भाषणांचा या पुस्तकात समावेश आहे.
राजकारणी म्हणजे दुसऱ्याच्या शिखातून पैसा काढणारा अशी ओळख असते. मात्र सांगळे यांनी स्वत:च्या खिशात हात घालून लोकांची कामे केली आहेत, असे नांदगावकर म्हणाले. मुजफ्फर हुसेन आणि वामन होवाळ यांनी या पुस्तकाची स्तुती केली. सांगळे हे समाजातील सर्व लोकांना आपलेसे वाटतात. म्हणूनच सर्व समाजघटकांचा त्यांना पाठिंबा मिळतो, असे प्रतिपादन होवाळ यांनी केले.
प्रत्येक निवडणुकीत माझी शैक्षणिक गुणवत्ता वाढत गेली. नगरसेवक झाल्यावर कला शाखेची पदवी संपादन केली. आमदार म्हणून निवड झाल्यानंतर कायद्याची पदवी संपादन केली. आता कायद्याचे पदव्युत्तर शिक्षण घेत आहे, असे सांगळे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)