जनहित याचिका भोवली; शिक्षकाची नोकरी गेली
By Admin | Updated: August 21, 2015 08:54 IST2015-08-20T23:19:05+5:302015-08-21T08:54:46+5:30
जनहित याचिका दाखल करवून राज्यातील प्राथमिक शिक्षणाच्या दुर्दशेकडे लक्ष वेधणारे व्हीसलब्लोअर शिक्षक शिवकुमार पाठक यांना नोकरीतून बडतर्फ करणारा

जनहित याचिका भोवली; शिक्षकाची नोकरी गेली
लखनौ : जनहित याचिका दाखल करवून राज्यातील प्राथमिक शिक्षणाच्या दुर्दशेकडे लक्ष वेधणारे व्हीसलब्लोअर शिक्षक शिवकुमार पाठक यांना नोकरीतून बडतर्फ करणारा आदेश उत्तर प्रदेश सरकारने जारी केला आहे.
सर्व सरकारी नोकर, बडे अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि न्यायपालिकेत सेवेवर असलेल्या सर्वांच्या मुलांना सरकारी शाळेमधूनच शिक्षण घेण्याची सक्ती केली तरच या शाळांचे दुष्टचक्र संपेल, असे अलाहाबाद उच्च न्यायालयाने दोन दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश सरकारवर ताशेरे ओढताना म्हटले होते. ज्यांची जनहित याचिका विचारात घेऊन न्यायालयाने ताशेरे ओढले त्या शिवकुमार पाठक यांना सरकारने तडकाफडकी नोकरीतून काढून टाकल्यामुळे शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.पाठक हे लांभुआ तहसीलमधील भदेया गटांतर्गत बीआरसी केंद्रात शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचे काम करीत होते. या काळात रजा घेण्याची परवानगी नसतानाही ते रजेवर राहिले आणि त्याबाबत त्यांनी कोणतेही समाधानकारक उत्तर न दिल्यामुळे त्यांना १३ आॅगस्टपासून नोकरीवरून काढण्यात आले असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी रमेश यादव यांनी म्हटले. दुसरीकडे मी जनहित याचिकेच्या निमित्ताने न्यायालयात गेलो तेव्हा रजा घेताना संबंधित अर्जावर स्वाक्षरी घेतलेली आहे, असे पाठक यांनी सांगितले.
(वृत्तसंस्था)