बेंच खरेदीवरून लोकप्रतिनिधींकडून प्रशासनाची कोंडी
By Admin | Updated: March 19, 2015 23:10 IST2015-03-19T22:36:32+5:302015-03-19T23:10:23+5:30
ई-निविदा प्रक्रियेवरच ठेवले बोट

बेंच खरेदीवरून लोकप्रतिनिधींकडून प्रशासनाची कोंडी
ई-निविदा प्रक्रियेवरच ठेवले बोट
नाशिक : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत करण्यात येणार्या दोन कोटींच्या बेंच खरेदीबाबत काही पदाधिकारी व सदस्यांनी शंका उपस्थित करीत प्रशासनाकडे याबाबत तक्रार केल्याचे कळते. येत्या सर्वसाधारण सभेतही याच विषयावर वादळी चर्चा होण्याची शक्यता काही लोकप्रतिनिधींनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, या दोन कोेटींच्या बेंच खरेदीबाबत राबविण्यात आलेल्या ई-निविदा प्रक्रियेवरच काही पदाधिकारी व सदस्यांनी शंका घेतली असून, ठराविक पुरवठादाराला अधिक सोयीच्या अटी-शर्ती टाकण्यात आल्याचा आरोप प्रशासनाकडे केल्याचे समजते.
विशेष म्हणजे ही बेंच खरेदी आधीपासूनच वादाच्या भोवर्यात असून, ही आधी दर-कराराप्रमाणे की ई-निविदा पद्धतीने राबवायची यावरून प्रशासन व लोकप्रतिनिधी यामध्ये मतभेद होते. नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत या बेंच खरेदीला मान्यता देण्यात आली होती. नाशिक व औरंगाबाद येथील मक्तेदारांमध्ये या बेंचचा पुरवठा करण्यावरून स्पर्धा लागल्यानेही दरकरार की ई-निविदा हा प्रश्न त्यावेळी उपस्थित करण्यात आला होता. आता तर दोन कोटी रुपयांच्या बेंच खरेदीवर काही पदाधिकारी व सदस्यांनी आक्षेप घेत ई-निविदा पद्धत राबविण्यावरच शंका उपस्थित करीत ही बेंच खरेदी रद्द करून नव्याने राबविण्यात यावी, यासाठी काही पदाधिकारी व सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या एका वरिष्ठ अधिकार्याकडे याबाबत काल (दि.१९) सायंकाळी तक्रार केल्याचे कळते. (प्रतिनिधी)