प्रस्ताव गेला, पण उशीर झाला

By Admin | Updated: February 6, 2015 01:17 IST2015-02-06T01:17:33+5:302015-02-06T01:17:33+5:30

- बेळगाव नाट्य संमेलन : नागपूरकरांची चूक भोवली

Proposal went, but it was late | प्रस्ताव गेला, पण उशीर झाला

प्रस्ताव गेला, पण उशीर झाला

-
ेळगाव नाट्य संमेलन : नागपूरकरांची चूक भोवली
नागपूर : अ.भा. मराठी नाट्य संमेलनात यंदा नागपूरकर कलावंतांना संधी न मिळाल्याची चर्चा नाट्य क्षेत्रात गाजते आहे. पण यात नागपूरकर कलांवतांचीच चूक असल्याचे मत नाट्य परिषदेच्या सभासदांनी व्यक्त केले. मुळात नागपूर शाखेतर्फे प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आणि योग्य वेळेत संमेलनात प्रस्ताव पाठविण्यातही आला. पण त्यात काही आवश्यक बदल करून हा प्रस्ताव नव्याने पाठविण्यात नागपूरकर कलावंतच अपयशी ठरल्याने संमेलनात नागपूरकर कलावंतांना संधी मिळू शकली नाही, याची खंत नागपूर नाट्य परिषदेलाही असल्याचे बोलले जात आहे.
पण संमेलनात नागपूरच्या कलावंतांना स्थान न मिळू शकल्याची चूक नाट्य परिषदेची नसून संबंधित कलावंतांचाच आळशीपणा त्याला कारणीभूत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे नाट्य परिषदेवर कुणी आरोप करीत असतील तर त्यात काहीही तथ्य नाही. अ.भा. नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती कार्यकारिणीत नागपुरातील चार सदस्य आहेत. याचा अर्थ त्यांनी केवळ नागपूरपुरताच विचार करावा, असे म्हणणे योग्य नाही. कारण ते सदस्य संपूर्ण महाराष्ट्राचे आहेत आणि मध्यवर्तीच्या पदावरून तोच विचार करणे आवश्यक आहे. त्यात स्वाभाविकपणे नागपूरबाबत आस्था असणे मान्य आहे. पण कलावंतांनीच चुका करायच्या आणि परिषदेवर खापर फोडायचे, अयोग्य आहे, असे मत मध्यवर्तीचे उपाध्यक्ष प्रमोद भुसारी यांनी व्यक्त केले.
आतापर्यंत संमेलनात ज्यांना संधी मिळाली त्यांना वगळून नव्या रंगकर्मींना संधी देण्यासाठी यंदा वीरेंद्र गणवीर यांचा प्रस्ताव परिषदेने स्वीकारला. त्यात २० रंगकर्मींची यादी जोडण्यात आल्याने निवड समितीने या प्रस्तावात बदल करून रंगकर्मींची संख्या कमी करण्याचा सल्ला दिला. कारण नागपूर ते बेळगाव हे अंतर आणि लागणारा खर्च आयोजकांना पेलणारा नव्हता. ही संख्या कमी करून प्रस्ताव देण्याचे गणवीर यांना सांगण्यात आले, पण त्यांनी प्रस्ताव उशिरा दिला. तोपर्यंत निवड झाली होती. यासंदर्भात आपण स्वत: प्रयत्न केले, पण त्यावेळी शक्यता नव्हती. ही परिषदेची चूक नाही. याशिवाय प्रत्येक वेळी नागपूरलाच संधी न देता विदर्भातल्या इतर कलावंतांनाही संधी मिळायला हवी. मानोरा शाखेला ही संधी यंदा लाभली. मध्यवर्तीत काम करताना प्रादेशिकतेपलीकडेही विचार करणे गरजेचे असते, असे मत उपाध्यक्ष प्रमोद भुसारी यांनी त्यांच्याशी संपर्क साधला असता लोकमतजवळ व्यक्त केले.

Web Title: Proposal went, but it was late

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.