‘नो फ्लाय झोन’ ठेवण्याचा प्रस्ताव फेटाळला
By Admin | Updated: January 19, 2015 03:01 IST2015-01-19T02:57:16+5:302015-01-19T03:01:30+5:30
बराक ओबामा यांच्या भारत दौऱ्यात २६ जानेवारी रोजी नवी दिल्ली येथे साज-या होणा-या प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून राजपथावर बराक ओबामा उपस्थित असतील

‘नो फ्लाय झोन’ ठेवण्याचा प्रस्ताव फेटाळला
नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत दौऱ्यात २६ जानेवारी रोजी नवी दिल्ली येथे साज-या होणा-या प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून राजपथावर बराक ओबामा उपस्थित असतील. या कालावधीत राजपथावरील ५ कि.मी. भाग नो फ्लाय झोन जाहीर करावा असा प्रस्ताव अमेरिकेने ठेवला होता; पण राजपथावर नो फ्लाय झोन जाहीर केल्यास प्रजासत्ताक दिनाचा पारंपरिक फ्लायपास्ट रद्द करावा लागेल असे कारण देऊन भारताने हा प्रस्ताव नाकारला आहे.
भारताची भूमिका
अमेरिकेच्या सुरक्षा पथकाने यासाठी नागरी उड्डयन खात्याच्या सरसंचालकांशीही संपर्क साधला; पण लष्करी अधिकाऱ्यांनी या प्रस्तावाला नकार देण्याचे आपले धोरण कायम ठेवले. प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात दुहेरी इंजिनची लष्करी विमाने व हेलिकॉप्टर उडणारच असा लष्कराचा दावा आहे. राजपथावर लष्करी विमाने व हेलिकॉप्टर उडण्याचा कालावधी फक्त दहा मिनिटांचा असेल. एरवी वर्षभर राष्ट्रपती भवन, साऊथ व नॉर्थ ब्लॉक, पंतप्रधानांचे निवासस्थान व आजूबाजूच्या परिसरात नो फ्लाय झोनच असतो, असे या अधिकाऱ्याने म्हटले आहे.
ओबामा पाहतील आपल्या देशाची विमाने
राजपथावर उपस्थित असणाऱ्या ओबामा यांना त्यांच्या देशाकडून भारताने खरेदी केलेली सी -१३० जे सुपर हर्क्युलस, सी-१७ ग्लोबमास्टर- ३, पोसिडॉन -८१ ही लांब पल्ल्याची गस्त विमाने पाहता येतील यासाठी भारताने ७ अब्ज डॉलरचा करार अमेरिकेशी केला होता.
त्याबरोबरच आधीच्या विमानांची पुन्हा आॅर्डर, तसेच अपाचे अटॅक व चिनूक या जडवाहू हेलिकॉप्टरची २.५ अब्ज डॉलरची आॅर्डर मिळण्याच्या बेतात असून, त्याचाही अंदाज घेण्याची संधी बराक ओबामा यांना मिळणार आहे.