राष्ट्रपतींचे वेतन २०० टक्क्यांनी वाढवण्याचा प्रस्ताव
By Admin | Updated: October 26, 2016 14:14 IST2016-10-26T14:00:19+5:302016-10-26T14:14:20+5:30
देशाचे प्रथम नागरिक असलेले राष्ट्रपती यांच्या वेतनात तीन पटीने वाढणार आहे. ही वेतनवाढी आताच्या वेतनानुसार 200 टक्क्यांनी वाढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

राष्ट्रपतींचे वेतन २०० टक्क्यांनी वाढवण्याचा प्रस्ताव
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 26 - देशाचे प्रथम नागरिक असलेले राष्ट्रपती यांच्या वेतनात तीन पटीने वाढ होणार आहे. ही वेतनवाढ आताच्या
वेतनानुसार 200 टक्क्यांनी वाढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यासंबंधीचा प्रस्ताव केंद्रीय गृहमंत्रालयाने तयार केला असून तो लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर केला जाणार आहे. सोबत उप-राष्ट्रपती आणि राज्यपाल यांचे वेतनही वाढणार असल्याचे म्हटले जात आहे. राष्ट्रपतींच्या तुलनेत सनदी अधिकारी आणि मंत्र्यांच्या सचिवांचे वेतन जास्त असल्याचे समोर आल्याने त्यांच्या वेतनवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे.
देशात सातवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर राष्ट्रपतींच्या वेतनवाढीची चर्चा सुरू झाली होती. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालय संबंधित प्रस्ताव मंजूरीसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत लवकरच सादर करणार आहे. मंत्रिमंडळातील बैठकीत प्रस्तावाला मंजूरी मिळाल्यास संबंधित विधेयक संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनात मांडण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सध्याच्या घडीला राष्ट्रपतींना महिन्याला दीड लाख रुपयांचे वेतन मिळत असून उप-राष्ट्रपतींना 1 लाख 25 हजार रुपये तर राज्यपालांना 1 लाख 10 हजार रुपये वेतन मिळत आहे.
मात्र, प्रस्तावाला मंजुरी दिल्यास राष्ट्रपतींचे महिन्याचे वेतन तब्बल 5 लाख रुपये तर उप-राष्ट्रपतींना 3.5 लाख रुपये अशी घसघशीत वेतनवाढ होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, 2008 पर्यंत राष्ट्रपतींचे महिन्याचे वेतन 50 हजार रुपये, उप-राष्ट्रपतींचे 40 हजार आणि राज्यपालांचे 36 हजार एवढे होते. 2008 साली त्यांच्या वेतनात दुप्पटीने वाढ करण्यात आली होती. त्यानंतर अद्यापपर्यंत वेतनवाढ झालेली नाही. विशेष म्हणजे, प्रस्तावाला मंजुरी मिळल्यास राष्ट्रपतींच्या निवृत्तीनंतर मिळणा-या पेन्शनमध्येही वाढ होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.