लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : फरार गँगस्टर दाऊद इब्राहीमच्या हस्तकाच्या गुजरातमधील भडोच येथील दोन मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. २०१५मधील दुहेरी हत्याकांडाच्या संदर्भात एनआयएने ही कारवाई केली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिली.
अटकेतील आरोपी मो. युनूस ऊर्फ मंजरो याच्या मालमत्ता अहमदाबादेतील एनआयएच्या विशेष न्यायालयाच्या आदेशानुसार बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंधक) अधिनियमांतर्गत जप्त केल्या आहेत.
एनआयएने एका निवेदनात म्हटले आहे की, जप्त केलेल्या मालमत्ता भडोच शहरातील वॉर्ड क्र. ३, सिटी सर्व्हे क्र. ३६१४ (एकूण क्षेत्रफळ : १४३.९६ वर्ग मीटर) मधील त्याचे घर, तसेच सिटी सर्व्हे क्र. ३६१५ (एकूण क्षेत्रफळ : २९.५९ वर्ग मीटर) चा समावेश आहे. कारवाई करताना मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
भाजप कार्यकर्त्याची हत्या
नोव्हेंबर २०१५मध्ये भाजप कार्यकर्ते शिरीष बंगाली व प्रग्नेश मिस्त्री यांची हत्या व गुन्हेगारी कटातील मंजरोच्या भूमिकेबद्दल त्याला अटक करण्यात आली. एनआयएने केलेली ही जप्तीची कारवाई पाकिस्तानमधून कार्यरत असलेल्या दाऊद टोळीच्या दहशतवादी कारवाया संपविण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे, असे एनआयएने कारवाईबाबत म्हटले आहे.