विरोधी पक्षांचा प्रचार ठरला आत्मघातकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 05:44 AM2019-05-26T05:44:19+5:302019-05-26T05:44:20+5:30

राहुल गांधी आणि इतर विरोधी पक्षीयांनी वैयक्तिकरीत्या मोदींना आपल्या टीकेचे लक्ष्य केले आणि त्यामुळे आपोआपच निवडणूक मोदी विरुद्ध राहुल अशी होत गेली.

The propaganda of opposition parties has led to suicide | विरोधी पक्षांचा प्रचार ठरला आत्मघातकी

विरोधी पक्षांचा प्रचार ठरला आत्मघातकी

Next

>दिलीप फडके

राहुल गांधी आणि इतर विरोधी पक्षीयांनी वैयक्तिकरीत्या मोदींना आपल्या टीकेचे लक्ष्य केले आणि त्यामुळे आपोआपच निवडणूक मोदी विरुद्ध राहुल अशी होत गेली. आणि असे होणे मोदींच्या फायद्यात जाणारे होते.
यावेळची लोकसभा निवडणूक अनेक अर्थांनी ऐतिहासिक मानावी लागेल. सलग दुसऱ्यांदा नरेंद्र मोदींनी विजयश्री खेचून आणली आहे. मोदींवरच्या टीकेला मतदारांनीच तडाखेबंद उत्तर दिले आहे.
शेतकरी, युवक यासारख्या समाजघटकांमध्ये अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत हे निश्चित. जीएसटी, नोटाबंदी यासारखे प्रश्नही आहेतच. त्या प्रश्नांमुळे जनतेत नाराजीदेखील आहे; पण त्यामुळे विरोधकांची विश्वासार्हता आपोआप सिद्ध होत नाही. त्यामुळे या नाराजीचा निवडणुकीच्या निकालावर कोणताही परिणाम झालेला दिसला नाही हे लक्षणीय आहे. असे कसे झाले हे समजावून घेतले तर या निवडणुकीचा खरा अन्वयार्थ समजावून घेता येईल. पाच वर्षांपूर्वी जेव्हा नरेंद्र मोदी पंतप्रधानपदावर विराजमान झाले तेव्हापासूनच मोदींचे समर्थक आणि विरोधक असे दोन गट निर्माण झाले होते. पारंपरिक राजकारणाच्या चौकटीत विचार करणाºया अनेकांना मोदी हा फिनॉमिनन समजू शकलेला नाही असे मला वाटते. स्वत:चा कोणताही वैयक्तिक स्वार्थ नसणारा, दिवसाचे वीस तास काम करणारा आणि जागतिक स्तरावर नवीन असूनदेखील आपला ठसा जागतिक पटलावर उमटवणारा हा नेता जनसामान्यांना सुरुवातीपासूनच भावला आहे, हे पारंपरिक विचारांच्या लोकांना समजूच शकलेले नाही.
निवडणुका जिंकण्यासाठी आवश्यक असणाºया तंत्रात वाकबगार असणारे आणि त्यांच्या यशस्वितेसाठी लागणारे संघटनेचे भक्कम जाळे उभारण्याचे कौशल्य असणारे अमित शहांसारखे सहकारी मोदींकडे आहेत. त्यामुळे त्यांना विजय मिळवणे शक्य होते. पण आजच्या विजयाला मोदींप्रमाणेच विरोधी पक्षांची आत्मघातकी धोरणेदेखील तितकीच कारणीभूत आहेत हेदेखील नजरेआड करता येणार नाही. जी लवचीकता मोदी-शहा यांनी नितीशकुमार किंवा उद्धव ठाकरे यांच्याशी युती कायम करताना दाखवली ती जर राहुल गांधी यांनी आम आदमी पार्टीशी किंवा महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीने बहुजन विकास किंवा मनसेच्या संदर्भात दाखवली असती तर काही प्रमाणात चित्र वेगळे दिसले असते. केवळ लोकांसमोर स्टेजवर हातात हात घालून उभे राहण्याने निवडणुकीत यशस्वी होण्यासाठी लागणारे सहकार्याचे वातावरण तयार होत नाही. त्यासाठी ते सहकार्य प्रत्यक्ष व्यवहारात दाखवावे लागते. राहुल आणि इतर विरोधी पक्षीयांनी वैयक्तिकरीत्या मोदींना आपल्या टीकेचे लक्ष्य केले आणि त्यामुळे आपोआपच निवडणूक मोदी विरुद्ध राहुल अशी होत गेली. आणि साहजिकच हे असे होणे मोदींच्या फायद्यात जाणारे होते. तब्बल सात चरणांत प्रदीर्घ काळासाठी चालणाºया प्रचारात प्रसंगानुसार आपला संदेश बदलण्याची व्यूहरचना मोदींनी वापरली. त्यांच्यासमोर विरोधक अधिकाधिक हास्यास्पद होत गेले. बालाकोटच्या हल्ल्यानंतर या हल्ल्याच्या सत्यतेबद्दल निरर्थक शंका घेताना विरोधी पक्षीयांनी आपल्या बेवकूफपणाचे जे प्रदर्शन केले ते जनसामान्यांना चीड निर्माण करणारे ठरले. एकूणच जनतेच्या मनाचा अंदाज आपल्याच कल्पनांच्या जगात वावरणाºया उल्लूमशाल नेत्यांना आला नाही. मोदीविरोधाचे चश्मे लावलेल्या तथाकथित निष्पक्ष पत्रकारांनादेखील तो आला नाही. या निवडणुकीत मोदी नुसते जिंकलेच आहेत असे नाही, तर निर्णायक पद्धतीने त्यांनी विजय मिळवला. त्याचा अन्वयार्थ खूप विचारपूर्वक समजावून घ्यावा लागेल हे नक्की.

(राजकीय विश्लेषक)

Web Title: The propaganda of opposition parties has led to suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.