अतुल्य भारतमध्ये अमिताभच्या जागी प्रियंका ?
By Admin | Updated: April 20, 2016 17:50 IST2016-04-20T17:50:11+5:302016-04-20T17:50:11+5:30
असहिष्णूतेसंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे आमीर खानला अतुल्य भारतच्या ब्रँड अॅम्बेसिडर पदावरुन डच्चू मिळाला.

अतुल्य भारतमध्ये अमिताभच्या जागी प्रियंका ?
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २० - असहिष्णूतेसंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे आमीर खानला अतुल्य भारतच्या ब्रँड अॅम्बेसिडर पदावरुन डच्चू मिळाला. त्यानंतर अतुल्य भारतच्या ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून अमिताभ बच्चन आणि प्रियंका चोप्रा यांच्या नावाची चर्चा सुरु झाली. सध्या या शर्यतीत प्रियंकाने अमिताभ यांच्यावर मात केल्याचे दिसत आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रियंकाला जी ओळख मिळाली आहे त्यामुळे अतुल्य भारतच्या ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून तिची निवड होण्याची जास्त शक्यता आहे. सध्या हॉलिवूडमध्ये व्यस्त असणा-या प्रियंकाला तिथे पुरस्कार मिळाले असून, यंदाच्या प्रतिष्ठेच्या ऑस्कर पुरस्कार सोहळयातही तिच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
एकूणच आंतरराष्ट्रीय स्तरावर तिला मिळणा-या प्रसिद्धीचा अतुल्य भारतसाठी उपयोग होऊ शकतो असे पर्यटन मंत्रालयातील सूत्रांचे म्हणणे आहे. पनामा पेपर लीक प्रकरणाशी नाव जोडले गेल्याचाही अमिताभ यांना फटका बसल्याची चर्चा आहे. केंद्रीय पर्यटन मंत्री महेश शर्मा यांनी अद्याप अंतिम निर्णय झाला नसल्याचे सांगितले.