Priyanka Gandhi on BJP Allegations:काँग्रेस नेत्या आणि वायनाडच्या खासदार प्रियंका गांधी वाड्रा यांनी पहिल्यांदाच जॉर्ज सोरोस यांच्यावर भाजपकडून होत असलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे अब्जाधीश जॉर्ज सोरोस यांच्याशी थेट संबंध असल्याचा भाजपचा आरोप प्रियंका यांनी मंगळवारी (10 डिसेंबर) पूर्णपणे फेटाळून लावला.
जेपी नड्डांचे सोनिया गांधींवर आरोपसोनिया गांधी यांचे जॉर्ज सोरोसशी संबंध असल्याच्या आरोप भाजपाध्यक्ष जेपी नड्डा यांनी केला आहे. काश्मीरला भारतापासून वेगळे करण्याच्या कल्पनेला कथितपणे समर्थन देणाऱ्या सोरोस फाऊंडेशनने निधी पुरवलेल्या संस्थेशी सोनिया गांधींचे कनेक्शन असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
'सरकारला अदानींवर वाद नको'
प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रियंका गांधी म्हणाल्या, "ही सर्वात हास्यास्पद गोष्ट आहे आणि भाजपवालेच हे करू शकतात. ते 1994 चा विषय आणत आहेत, पण याबद्दल कोणाकडेही रेकॉर्ड उपलब्ध नाही. ते काय बोलतात त्याची मला कल्पना नाही. त्यांना सभागृह चालवायचे नाही, हे मात्र खरे आहे."
"केंद्र सरकार अदानी मुद्द्यावर चर्चा टाळायची आहे. आम्हाला सभागृह चालवायचे आहे, पण सरकारला अदानींवर चर्चा नकोय. त्यामुळेच ते असे मुद्दे मांडत असतात. सोरोस प्रकरण 1994 सालचे आहे आणि अदानींवरील चर्चा टाळण्यासाठी ते आता मुद्दाम हे प्रकरण उकरुन काढत आहेत," अशी टीका प्रियंका गांधींनी केली.
आरोप निराधार काँग्रेसचे राज्यसभा खासदार प्रमोद तिवारी यांनीही हे आरोप बिनबुडाचे आणि पूर्णपणे खोटे असल्याचे सांगत फेटाळले आहेत. अदानी वादासह इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवरून लक्ष हटवण्यासाठी भाजप हा आरोप करत असल्याचा युक्तिवाद काँग्रेस नेत्यांनी केला.