उत्तर प्रदेशात काँग्रेसकडून मुख्यमंत्रिपदासाठी प्रियंका गांधींना पसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2016 18:29 IST2016-05-01T18:29:49+5:302016-05-01T18:29:49+5:30
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची कन्या प्रियंका गांधी उत्तर प्रदेशमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.
उत्तर प्रदेशात काँग्रेसकडून मुख्यमंत्रिपदासाठी प्रियंका गांधींना पसंती
ऑनलाइन लोकमत
लखनौ, दि. 1- उत्तर प्रदेशमध्ये 2017ला विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी सर्वच पक्ष संपूर्ण ताकदीनिशी तयारीला लागले आहेत. काँग्रेस पक्षही उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी सज्ज असून, पक्षाची होत असलेली पडझड रोखण्याचं आव्हान काँग्रेससमोर उभं ठाकलं आहे.
काँग्रेस पक्ष उत्तर प्रदेश निवडणुका जिंकण्याबाबत गंभीर असून, त्यानुसारच रणनीती आखली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची कन्या प्रियंका गांधी उत्तर प्रदेशमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. प्रियंका गांधी याच उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारही हव्यात, असा उत्तर प्रदेशमधील काँग्रेस कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. राहुल गांधी यांच्या नावाचाही विचार केला जात आहे. मात्र काँग्रेसमधील सूत्रांनुसार, 19 मेनंतर याबाबत अधिकृत घोषणा काँग्रेसकडून होण्याची शक्यता आहे.
19 मे रोजी पाच राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकांची मतमोजणी होणार आहे. याचदरम्यान प्रियंका गांधी उत्तर प्रदेशात काँग्रेसकडून मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार घोषित झाल्या, तर निवडणुकीला वेगळा रंग चढणार आहे. मागच्या अनेक निवडणुकांमध्ये प्रियंका गांधी प्रत्यक्ष निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्यापासून काहीसं अंतर राखून होत्या. मात्र त्यांनी काँग्रेसच्या प्रचारसभांमध्ये सक्रिय नोंदवला होता. त्यामुळे उत्तर प्रदेश निवडणुकीत काँग्रेस काय खेळी खेळते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.