काँग्रेस खासदार प्रियांका गांधी वाड्रा यांनी काल पॅलिस्टाइन लिहिलेली बॅग घेऊन संसदेत पोहोचल्या. याबाबतचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. या बॅगच्या माध्यमाने प्रियांका गांधी पुन्हा एकदा पॅलेस्टाइनच्या समर्थनार्थ दिसून आल्या. दरम्यान, आता त्यांचे पाकिस्तानातही कौतुक होत आहे. पाकिस्तानचे माजी मंत्री फवाद हसन चौधरी यांनी प्रियांका गांधी यांचा हा फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केला आहे.
"हे आमचं युद्ध होतं, तुम्ही फक्त..."; PM मोदींच्या १९७१ च्या युद्धाच्या पोस्टवर बांगलादेशचा आक्षेप
पाकिस्तानी नेते फवाद चौधरी यांनी पोस्टमध्ये लिहिले की, 'जवाहरलाल नेहरूंसारख्या महान स्वातंत्र्यसैनिकाच्या नातीकडून आपण आणखी काय अपेक्षा करू शकतो? प्रियांका गांधी बौनेंमध्ये उंच उभ्या आहेत, आजपर्यंत एकाही पाकिस्तानी संसद सदस्याने असे धाडस दाखवले नाही, ही लाजिरवाणी बाब आहे.
काँग्रेस खासदार प्रियांका गांधी वाड्रा यांनी सोमवारी पॅलेस्टाईनच्या लोकांप्रती पाठिंबा आणि एकता दर्शवत त्यावर "पॅलेस्टाईन" लिहिलेली हँडबॅग घेऊन संसदेत पोहोचल्या. काँग्रेसच्या सरचिटणीस आणि वायनाडच्या खासदार प्रियांका गांधी गाझामधील इस्रायलच्या कारवाईविरोधात आवाज उठवत आहेत.
प्रियांका गांधी संसदेत घेऊन गेलेल्या बॅगेवर ‘पॅलेस्टाईन’ असे लिहिलेले होते आणि पॅलेस्टिनी एकतेचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या टरबूजसारखे पॅलेस्टिनी चिन्हही होते. टरबूज हा पॅलेस्टिनी संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे. कट टरबूजचे चित्र आणि इमोजी बहुतेकदा पॅलेस्टाईनच्या लोकांशी एकता दाखवण्यासाठी वापरतात.
प्रियांका गांधी पॅलेस्टाइन आणि गाझा येथील पीडितांसाठी सातत्याने आवाज उठवत आहेत. यावर्षी ऑक्टोबरमध्ये हमास आणि इस्रायलमध्ये सुरू झालेल्या युद्धाला एक वर्ष उलटून गेले आहे. गाझामध्ये वाढत्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर प्रियांका गांधी यांनी इस्रायलवर टीका केली. गाझा प्रत्येक आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन करत असल्याचा आरोप करत प्रियांका गांधी म्हणाल्या की, ७,००० लोक मारल्यानंतरही हिंसाचार थांबलेला नाही. यामध्ये ३,००० निरागस बालकांचा समावेश होता. वायनाडमध्ये निवडणूक लढवतानाही प्रियांका गांधी यांनी पॅलेस्टाईनचा मुद्दा सातत्याने मांडला होता.
भाजपाने प्रियांका गांधी यांच्यावर केली टीका
काँग्रेस नेत्या खासदार प्रियांका गांधी यांच्या 'पॅलेस्टाइन' लिहिलेल्या बॅगवर टीका केली. भाजप नेते आणि खासदार संबित पात्रा म्हणाले की, गांधी घराणे नेहमीच तुष्टीकरणाची बॅग घेऊन आले आहे आणि निवडणुकीतील त्यांच्या पराभवाचे कारण तुष्टीकरणाची बॅग आहे.