देशात लिंग परिवर्तित व्यक्ती प्रथमच प्राचार्य
By Admin | Updated: May 27, 2015 23:55 IST2015-05-27T23:55:24+5:302015-05-27T23:55:24+5:30
पश्चिम बंगालमधील कृष्णानगर महिला कॉलेज सध्या वेगळ्या अर्थाने चर्चेत आहे. या महाविद्यालयात ९ जून रोजी प्राचार्यपदी येत असलेल्या मनाबी बंदोपाध्याय यांनी लिंगबदलाची शस्त्रक्रिया केली आहे.

देशात लिंग परिवर्तित व्यक्ती प्रथमच प्राचार्य
कोलकता : पश्चिम बंगालमधील कृष्णानगर महिला कॉलेज सध्या वेगळ्या अर्थाने चर्चेत आहे. या महाविद्यालयात ९ जून रोजी प्राचार्यपदी येत असलेल्या मनाबी बंदोपाध्याय यांनी लिंगबदलाची शस्त्रक्रिया केली आहे. अशा पद्धतीने लिंगबदल केलेली व्यक्ती महाविद्यालयात प्राचार्य म्हणून नियुक्त होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
तृतीयपंथीयांना बळ देण्याचा दृष्टिकोन ठेवून राज्य सरकारने नाडिया जिल्ह्यातील कृष्णानगर महिला महाविद्यालयाच्या प्राचार्य म्हणून मनाबी यांची नियुक्ती केली आहे.
दक्षिण कोलकता येथे राहणाऱ्या मनाबी पूर्वी सोमनाथ म्हणून ओळखल्या जात असत. उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील नैहाती गावी एका मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला. २००३ मध्ये त्यांनी लिंगबदलाची शस्त्रक्रिया करून घेतली. सध्या आपले लक्ष विद्यार्थ्यांना शिकविण्यावरच केंद्रित असल्याचे त्यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)
आपले काम सचोटीने केले तर आपोआपच आपल्याला आदर मिळतो असे त्या म्हणाल्या. मी गेली कित्येक वर्षे शिकवते आहे, पण प्राचार्य म्हणून मिळालेल्या नव्या ओळखीमुळे माझी ओळख माझ्या करिअरमध्ये अडसर बनलेली नाही हे सिद्ध झाले आहे, असे मनाबी यांनी म्हटले आहे.