नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सकाळी साऊथ ब्लॉक इमारतीतील आपल्या कार्यालयात फेरफटका मारला आणि कामाची पाहणी केली. पीएमओ असलेल्या इमारतीचा फेरफटका मारून पाहणी करण्याचे संकेत मोदींनी मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी पीएमओच्या अधिकार्यांना दिले होते. यावेळी मोदींनी विविध विभागाच्या कामाविषयी आणि उपलब्ध सुविधांची माहिती घेतली. त्यांना ७ रेस कोर्स रोड येथील निवासस्थानी असलेल्या सुविधांपेक्षा साऊथ ब्लॉकमध्ये सुविधा कमी असल्याचे आढळून आले. डॉ. मनमोहनसिंग यांच्या काळात पंतप्रधानांच्या निवासस्थानातील कार्यालयातून अधिक काम चालत असे, अशी माहिती त्यांचे सचिव रामानुजम यांनी दिल्याचे कळते. मनमोहनसिंग यांच्या काळात रामानुजम पीएमओत होते. मोदींनी साऊथ ब्लॉक इमारतीतील कार्यालयातून अधिक कामकाज चालावे आणि येथील सुविधांमध्ये हळूहळू वाढ करण्यात यावी, असे सुचविले. परंतु त्यासाठी अतिरिक्त खर्च न करण्याचे निर्देश त्यांनी दिले. जनतेशी संवाद साधताना पंतप्रधानांना असलेले एसपीजीचे सुरक्षा कवच कमी करून जनतक्रार निवारण यंत्रणा मजबूत करण्यात येण्याची शक्यता आहे. (लोकमत न्यूजनेटवर्क)
पंतप्रधानांचा पीएमओत फेरफटका
By admin | Updated: May 30, 2014 03:13 IST