आठवर्षीय तय्यबाच्या पत्राची खुद्द पंतप्रधानांकडून दखल
By Admin | Updated: May 21, 2015 23:37 IST2015-05-21T23:37:12+5:302015-05-21T23:37:12+5:30
जन्मजात हृदयरोगी आठवर्षीय तय्यबाने सहज सुचले म्हणून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच पत्र पाठवले आणि काय आश्चर्य, पंतप्रधान कार्यालयाकडून (पीएमओ)या चिमुरडीला लागलीच पत्र आले.

आठवर्षीय तय्यबाच्या पत्राची खुद्द पंतप्रधानांकडून दखल
पीएमओने मागितला तपशील : जन्मजात हृदयरोगी मुलीवर होणार उपचार; वडिलांची ओढाताण बघून निराश झालेल्या चिमुकलीने लिहिले पत्र
आग्रा : जन्मजात हृदयरोगी आठवर्षीय तय्यबाने सहज सुचले म्हणून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच पत्र पाठवले आणि काय आश्चर्य, पंतप्रधान कार्यालयाकडून (पीएमओ)या चिमुरडीला लागलीच पत्र आले. तिला आजाराचा सर्व तपशील मागतानाच उपचाराचा खर्च कितीही येऊ द्या, असा आदेश संबंधित रुग्णालयाला धडकलाही.
स्वप्नवत वाटणारी ही घटना प्रत्यक्षात उतरत असल्याने तय्यबाच्या कुटुंबालाही आश्चर्याचा पारावार उरलेला नाही. कामगार असलेल्या वडिलांची होत असलेली ओढाताण बघून तय्यबा निराश झाली होती. आई-वडिलांवर पडणारा आर्थिक बोजा तिला असह्य झाला होता. एक दिवस टीव्हीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींना बघून तिला वाटले थेट पंतप्रधानांनाच मदत का मागू नये? पंतप्रधान सर्वांनाच मदत करतात हे टीव्हीवर बघितले होते.
मी भारतीय नागरिक असून मलाही जगण्याचा हक्क आहे या भावनेतून मला पंतप्रधानांना पत्र पाठविण्याची कल्पना सुचली, असे तय्यबाने सांगितले. ती सध्या औषधावरच जगत आहे.
तिने मोदींना पत्रातून आपल्या कुटुंबाची सर्व परिस्थिती आणि जन्मजात असलेल्या हृदयरोगाची माहिती देत उपचारावर होणाऱ्या १५ ते २० लाख रुपयांच्या मदतीची मागणी केली.
वडील एका जोड्याच्या कारखान्यात रोजंदारीवर काम करतात. पाच जणांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहही योग्यरीत्या होऊ शकत नसताना माझ्यावर उपचार कसे शक्य होणार? असे तिने मोदींना लिहिलेल्या पत्रात नमूद केले होते. (वृत्तसंस्था)
४पीएमओच्या आदेशाची तातडीने दखल घेत दिल्ली सरकारने गुरु तेग बहादूर रुग्णालयाला तय्यबावर उपचार सुरू करण्याचा आदेश दिला आहे. अनेक स्वयंसेवी संस्थांकडे मदतीची याचना करूनही तिच्या पालकांना निराशा पत्करावी लागली होती.
४ती चार-पाच वर्षांपूर्वी माझ्याकडे आली तेव्हा तिला जन्मजात हृदयरोग असल्याचे निदान झाले. तिच्या हृदयाच्या झडपीत दोष होता. उजवीकडील मुख्य धमणी योग्य ठिकाणी नव्हती. तिला नेहमी सर्दी आणि कफाचा त्रास होता. रक्ताल्पतेमुळे (अॅनेमिया) तिचा त्रास वाढला. तिची वाढही योग्य प्रमाणात झालेली नाही. तिला खास उपचार देणे आग्य्रात शक्य नसल्याने तय्यबाला दिल्लीला पाठविण्याचा सल्ला मी तिच्या पालकांना दिला होता, असे तिच्यावर उपचार करणारे डॉक्टर एस. के. कार्ला यांनी सांगितले.
बँक अधिकारी व्हायचेय...
४तय्यबाची चिंता लवकरच संपून जावी पुन्हा कधी त्रास होऊ नये अशी आशा तिचे कुटुंबीय बाळगून आहेत. तिसऱ्या वर्गात शिकणाऱ्या तय्यबाला बँक अधिकारी व्हायचे आहे. आपण अधिकारी बनल्याने कुटुंबाची आर्थिक दुर्दशा संपून जाईल, अशी आशा ती बाळगून आहे.