वाराणसीतील जयापूर गाव पंतप्रधान दत्तक घेणार
By Admin | Updated: November 7, 2014 04:13 IST2014-11-07T04:13:20+5:302014-11-07T04:13:20+5:30
नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून वाराणसी या आपल्या लोकसभा मतदारसंघास शुक्रवार आणि शनिवारी प्रथमच भेट देणार

वाराणसीतील जयापूर गाव पंतप्रधान दत्तक घेणार
वाराणसी : नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून वाराणसी या आपल्या लोकसभा मतदारसंघास शुक्रवार आणि शनिवारी प्रथमच भेट देणार असून त्यात इतर कार्यक्रमांखेरीज मोदी वाराणसीचे लोकसभा सदस्य या नात्याने मतदारसंघातील जयापूर हे गाव ‘दत्तक’ घेण्याची घोषणा करण्याची दाट शक्यता आहे. हे लक्षात घेऊन जयापूर गाव झटपट स्वच्छ करण्याची प्रशासनाची धावपळ सुरु आहे.
केंद्र सरकारने अलीकडेच ‘खासदार आदर्श ग्राम योजना’ जाहीर केली असून यात प्रत्येक खासदाराने आपल्या मतदारसंघातील एक गाव दत्तक घेऊन त्याचा ‘आदर्श गाव’ म्हणून विकास करणे अपेक्षित आहे. अधिकृत घोषणा अद्याप व्हायची असली तरी या योजनेनुसार मोदी जयापूर गाव ‘दत्तक’ घेणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. मोदी स्वत: शुक्रवारी जयापूरला भेट देणार असून त्यावेळी होणाऱ्या जाहीर कार्यक्रमात याची घोषणा होऊ शकते. तसे झाले तर गावात अद्ययावत आरोग्य केंद्र, माध्यमिक शाळा, सार्वजनिक स्वच्छतागृहे, पेयजल योजना, पोस्ट आॅफिस व बँकांच्या शाखा अशा सोयी होतील, अशी गावकऱ्यांची अपेक्षा आहे. वाराणसी लोकसभा मतदारसंघातील ज्या रोहानिया भागात, प्रतिबंधात्मक आदेश असूनही उमेदवारी अर्ज भरताना प्रचंड मिरवणूक काढली म्हणून मोदींवर निवडणूक आयोेगाने नाराजी व्यक्त केली होती त्याच रोहानिया विधानसभा क्षेत्रात जयापूर गाव येते. राजा तालाब तालुक्यात येणारे हे गाव वाराणसी शहरापासून सुमारे २५ कि.मी. अंतरावर आहे. चार हजार लोकवस्तीच्या या गावात मतदारांची संख्या २,७०० आहे. एकही मुस्लिम व्यक्ती नसलेल्या जयापूरमध्ये भूमिहार आणि पटेल समाजाचे प्राबल्य आहे.
पंतप्रधान झाल्यानंतर मोदी यांचा आपल्या मतदारसंघाचा हा पहिलाच दौरा आहे. याआधी लोकसभा निवडणुकीत भाजपाला पूर्ण बहुमत मिळाल्यानंतर त्यावेळचे पक्षाध्यक्ष राजनाथ सिंग यांच्यासोबत मोदींनी वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिरात पूजाअर्चा केली होती व दशअश्वमेध घाटावर गंगा आरती केली होती. (वृत्तसंस्था)