पंतप्रधानांसमोर मंत्री परफॉर्मन्स रिपोर्ट करणार सादर
By Admin | Updated: June 23, 2016 10:02 IST2016-06-23T09:57:08+5:302016-06-23T10:02:37+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या मंत्र्यांना ३० जूनला होणा-या बैठकीच्यावेळी स्वत:च्या कामगिरीचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

पंतप्रधानांसमोर मंत्री परफॉर्मन्स रिपोर्ट करणार सादर
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २३ - मंत्रिमंडळात खातेबदल होणार असल्याची चर्चा असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या मंत्र्यांना ३० जूनला होणा-या बैठकीच्यावेळी स्वत:च्या कामगिरीचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार मोदींनी मंत्र्यांना त्यांच्या परफॉर्मन्सचे प्रेझेंटेशन करण्यास सांगितले आहे.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळात खातेबदल होईल अशी चर्चा असताना ही बैठक होत आहे. पुढच्यावर्षी उत्तरप्रदेश आणि पंजाबमध्ये होणा-या विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर या राज्यांना मंत्रिमंडळात जास्तीत जास्त प्रतिनिधीत्व देण्याचा विचार आहे.
३० जूनच्या बैठकीच्या आधारावर मंत्रिमंडळात खातेपालट होऊ शकतो असे सरकारमधील उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले. पंतप्रधान आपल्या मंत्र्यांच्या कामगिरीचा सतत आढावा घेत असतात. महत्वाच्या सरकारी योजनांच्या अंमलबजावणीचा लाभ लोकांपर्यंत पोहोचून निवडणुकीत त्याचा फायदा घेण्याचा सरकारचा उद्देश आहे.