पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतले जयापूर दत्तक
By Admin | Updated: November 7, 2014 15:24 IST2014-11-07T14:08:54+5:302014-11-07T15:24:03+5:30
मी जयापूरला दत्तक घेत नाहीये तर जयापूरने त्यांच्या खासदाराला दत्तक घेऊन त्याला शिकवावे अशी भावनिक साद पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जयापूरच्या ग्रामस्थांना घातली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतले जयापूर दत्तक
>ऑनलाइन लोकमत
वाराणसी, दि. ७ - जयापूर गावाशी जोडले जाणे हे माझे भाग्य आहे. मी जयापूरला दत्तक घेत नाहीये तर जयापूरने त्यांच्या खासदाराला दत्तक घेऊन त्याला शिकवावे अशी भावनिक साद पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जयापूरच्या ग्रामस्थांना घातली.
पंतप्रधान झाल्यापासून पहिल्यांदाच नरेंद्र मोदींनी त्यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसीला भेट दिली व जयापूर गाव दत्तक घ्यायची घोषणा केली. शुक्रवारी दुपारी जयापूरमध्ये आगमन झाल्यावर मोदींनी ग्रामस्थांशी संवाद साधला. मला वाराणसीतून उमेदवारी जाहीर झाल्यावर जयापूरमध्ये भीषण आग लागली होती, त्यानंतर मी जयापूरशी संपर्कात आलो आणि ज्या संबंधांची सुरुवात संकटातून होते ती कधीच संपत नाहीत असे मोदी म्हणाले.
आपण कुठेही गेलो, कोणत्याही पदावर पोचलो तरीही आपल्याला गावातून बरंच काही शिकायला मिळतं. मोठमोठ्या अधिका-यांकडून जे शिकायला मिळत नाही ते गावातील ज्येष्ठांकडून शिकायला मिळते असे मोदी म्हणाले. केंद्र सरकारने अलीकडेच ‘खासदार आदर्श ग्राम योजना’ जाहीर केली असून यात प्रत्येक खासदाराने आपल्या मतदारसंघातील एक गाव दत्तक घेऊन त्याचा ‘आदर्श गाव’ म्हणून विकास करणे अपेक्षित आहे. त्याच पार्श्वभूमीवर मोदींनी हे गाव दत्तक घेतले.
यावेळी मोदींनी अनेक विषयावंर ग्रामस्थांशी चर्चा केली. मुलगी हे अभिमानाचे प्रतीक असून घरात मुलीचा जन्म झाल्यावर प्रत्येकावे घरात आनंदोत्सव साजरा करायला हवा असे त्यांनी सांगितले. गावांमधून जातीयवादाचे विष बाहेर फेकून आपण सर्वांनी एकत्र यायला हवे, मगच गावाचा विकास शक्य होईल, असेही ते म्हणाले.