ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानसोबत निर्माण झालेला तणाव आणि युद्धाला तोंड फुटण्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सीडीएस आणि लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या प्रमुखांशी महत्त्वपूर्ण बैठक घेत चर्चा केली. या बैठकीत मोदींनी या माजी अधिकाऱ्यांसोबत पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासोबतही बैठक घेतली आहे. यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हेही उपस्थित होते. या बैठकीमध्ये सध्याच्या परिस्थितीसह आगामी रणनीतीबाबत चर्चा झाल्याचं प्राथमिक वृत्त आहे.
दरम्यान, पाकिस्तानने आज पुन्हा एकदा भारतातील सीमेलगतच्या विविध शहरांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. उत्तरेतील बारामुल्लापासून दक्षिणेला भूजपर्यंत जवळपास २६ ठिकाणी पाकिस्तानकडून ड्रोन हल्ले करण्यात आले. मात्र हे हल्ले भारताच्या सुरक्षा यंत्रणांनी उधळून लावले आहेत. पाकिस्ताने नागरी आणि लष्करी भागांना लक्ष्य करून हे हल्ले केले होते, अशी माहिती लष्कराकडून देण्यात आली आहे.
याबाबत भारतीय लष्कराकडून देण्यात आलेल्या अधिक माहितीनुसार बारामुल्ला, श्रीनगर, अवंतीपुरा, नागरोटा, जम्मू, फिरोजपूर, पठाणकोट, फझिल्का, लालगड जट्टा, जैसलमेर, बाडमेर, भूज, कौरबेत आणि लाखी नाला, या ठिकाणांना आज पाकिस्तानने ड्रोनच्या माध्यमातून लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला.