पाक लष्कराच्या होकारानंतरच पंतप्रधान नरेंद्र मोदी व नवाज शरीफ भेट सफल
By Admin | Updated: December 28, 2015 00:28 IST2015-12-28T00:28:45+5:302015-12-28T00:28:45+5:30
पाकिस्तानी लष्कराच्या होकारानंतरच भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी व पाक पंतप्रधान नवाज शरीफ यांची शुक्रवारची भेट होऊ शकली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

पाक लष्कराच्या होकारानंतरच पंतप्रधान नरेंद्र मोदी व नवाज शरीफ भेट सफल
इस्लामाबाद : पाकिस्तानी लष्कराच्या होकारानंतरच भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी व पाक पंतप्रधान नवाज शरीफ यांची शुक्रवारची भेट होऊ शकली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. उभय देशांतील संबंध गेल्या काही वर्षांत बरेच ताणले गेले होते. अलीकडेच पाकने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बदलले. नव्या सल्लागारांनी लष्कराचा होकार मिळविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली, त्यामुळेच लाहोर भेट सफल झाली, परिणामी भविष्यातील चर्चेचा मार्ग मोकळा झाला, असे पाक अधिकाऱ्यांनी सांगितले.
पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी सांगितले की, पंतप्रधान नवाज शरीफ यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी फोन केला, त्याच वेळी दोघांनी ही भेट अचानक ठरवली. ही काही पूर्वनियोजित भेट नव्हती. दोन्ही नेते भेटल्यानंतर येत्या जानेवारीत सचिवस्तरीय बैठक घेण्याचे त्यांनी ठरवले. भारत व पाकिस्तान दोन्ही अण्वस्त्रसंपन्न देश असून गेल्या ६५ वर्षांपासून दोन्ही देशातील संबंध ताणलेले आहेत. या भेटीने उभय देशांत चर्चा तरी सुरू होईल, असे मानले जात आहे. या भेटीचे श्रेय पाक लष्कराला आहे असे सांगून पाक अधिकारी म्हणाले की, अलीकडेच लष्करातील सेवानिवृत्त जनरल नासिरखान जान्जुआ यांची शरीफ यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती केली. ते शरीफ यांचे मित्र मानले जातात. पाकिस्तानी राजकारणात नवाज शरीफ यांच्या प्रवेशाच्या वेळी नासिरखान यांनी मदत केली होती, असे मानले जाते. त्यांनी प्रयत्न केल्यामुळे पाकिस्तानला चर्चा सुरू करण्यासाठी, विशेषत: दहशतवादासारख्या काटेरी विषयावर बोलण्यासाठी धैर्य आले.
वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्याने सांगितले की, यावेळी स्थिती वेगळी आहे. वरिष्ठ लष्करी अधिकारी, विशेष म्हणजे पाक लष्करप्रमुख त्याला अनुकूल आहेत. त्यामुळे काहीतरी सकारात्मक होईल. नासिरखान जान्जुआ यांचा या विषयातील अनुभव दांडगा असून त्यांचा लष्करप्रमुखांशी थेट संपर्क आहे. नवाज शरीफ यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्याने अलीकडे असेच मत व्यक्त केले होते. (वृत्तसंस्था)
दोन्ही देशांतील पंतप्रधानांचा थेट संपर्क ठप्प झालेले संबंध प्रवाही करण्यात निश्चितच उपयोगी पडेल, असे दिल्लीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मत आहे. मोदी व शरीफ पॅरिस येथे हवामान परिषदेत भेटले होते; पण त्यावेळी फार काही झाले नाही. खरा बदल झाला तो नासिरखान यांच्या नियुक्तीनंतरच व त्यामुळे दोन्ही नेते भेटू शकले. डिसेंबर महिन्यातच भारत-पाकचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बँकॉक येथे भेटले होते.
बँकॉक भेटीनंतरच परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचा पाकिस्तान दौरा झाला. पाककडून होणाऱ्या दहशतवादी कारवाया व मुंबईत २००८ मध्ये झालेला हल्ला हे दोन प्रश्न भारताच्या दृष्टीने प्रमुख प्रश्न आहेत, तर काश्मीर प्रश्न पाकला महत्त्वाचा वाटतो.
>>> भारत-पाक जानेवारीतील चर्चेतून काहीही निषन्न होणार नाही -सरताज अजिज
जानेवारीत होणाऱ्या चर्चेत सर्व प्रश्नांचा प्राधान्याने विचार झाला पाहिजे. शेजारील राष्ट्रांशी सौहार्दाचे संबंध निर्माण झाले पाहिजेत हे पंतप्रधान नवाज शरीफ यांचे धोरण असल्याचे त्यांनी सांगितले.
इस्लामाबाद : येत्या जानेवारीत होणाऱ्या भारत-पाक सचिवस्तरीय चर्चेतून फार काही निष्पन्न होणार नाही, अशी प्रतिक्रिया सरताज अजिज यांनी शनिवारी व्यक्त केली. ते पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचे परराष्ट्रविषयक सल्लागार आहेत. पाकिस्तान रेडिओवरील करंट अफेअर्स कार्यक्रमात ते म्हणाले की, दोन्ही देशांमधील सर्व प्रश्नांवर तातडीने तोडगा निघेल अशी अपेक्षा ठेवणे व्यर्थ आहे. दोन्ही देशातील तणाव कमी होईल व प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शांतता निर्माण करून त्या भागात राहणाऱ्या लोकांचे जीवन कसे सुरक्षित होईल हे प्रथम पाहिले पाहिजे, असे ते म्हणाले.
> मोदी ही जुन्या बाटलीतील नवी दारू
पाकचे वरिष्ठ लष्करी अधिकारी म्हणाले, हे सकारात्मक पाऊल आहे यात शंका नाही; पण आपण सावध राहिले पाहिजे. मोदी म्हणजे जुन्या बाटलीतील नवी दारू असून शरीफ यांनी एकावेळी एकच घोट घ्यावा.