पंतप्रधान मोदी तीन देशांच्या दौऱ्यावर
By Admin | Updated: March 10, 2015 23:24 IST2015-03-10T23:24:41+5:302015-03-10T23:24:41+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंगळवारी आपल्या तीन देशांच्या दौऱ्यासाठी नवी दिल्ली येथून सेशेल्सला रवाना झाले. ते सेशेल्स, श्रीलंका आणि मॉरिशस

पंतप्रधान मोदी तीन देशांच्या दौऱ्यावर
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंगळवारी आपल्या तीन देशांच्या दौऱ्यासाठी नवी दिल्ली येथून सेशेल्सला रवाना झाले. ते सेशेल्स, श्रीलंका आणि मॉरिशस या तीन देशांना भेट देणार आहेत. आपल्या पाच दिवसांच्या विदेश दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात ते सेशेल्सला जाणार आहेत.
देशाची सुरक्षा आणि प्रगतीसाठी भारताचे या तिन्ही देशांसोबत द्विपक्षीय संबंध बळकट असणे आवश्यक आहे, असे मोदी यांनी सेशेल्सला रवाना होताना सांगितले.
गेल्या ३३ वर्षांत सेशेल्सचा दौरा करणारे मोदी हे पहिलेच भारतीय पंतप्रधान आहेत. तसेच भारताच्या पंतप्रधानांनी श्रीलंकेचा दौरा करण्याची गेल्या २८ वर्षांतील ही पहिलीच वेळ आहे. ते १३ आणि १४ मार्चला श्रीलंकेला भेट देतील. हिंद महासागर क्षेत्रातील देशांसोबत संबंध बळकट करण्याला भारत अत्याधिक महत्त्व देत असल्याचे मोदी यांनी स्पष्ट केले. चीनने हिंद महासागरातील क्षेत्रांवर लक्ष देण्याला सुरुवात केल्याच्या पार्श्वभूमीवर मोदी या तीन देशांच्या दौऱ्यावर जात आहेत.
(लोकमत न्यूज नेटवर्क)