पंतप्रधान मोदी घालतात १० लाखांचा सुट - राहुल गांधी
By Admin | Updated: January 29, 2015 18:23 IST2015-01-29T18:23:24+5:302015-01-29T18:23:24+5:30
प्रत्येकांच्या खात्यात प्रत्येकी १५ लाख रुपये जमा करु असे सांगणारे नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर १० लाख रुपयांचा सुट घालतात असा आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला.

पंतप्रधान मोदी घालतात १० लाखांचा सुट - राहुल गांधी
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २९ - दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात रंगत भरली असून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यास सुरुवात झाली आहे. परदेशातील काळा पैसा भारतात आणून प्रत्येकांच्या खात्यात प्रत्येकी १५ लाख रुपये जमा करु असे सांगणारे नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर १० लाख रुपयांचा सुट घालतात असा आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. ते काँग्रेस उमेदवाराच्या निवडणूक प्रचार सभेत बोलत होते. राहुल गांधी यांनी मोदी यांच्याबरोबरच आम आदमी पार्टीवरही आपले टिकास्त्र सोडले. सिलामपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलताना राहुल गांधी यांनी मोदी यांना आपले पहिले लक्ष्य केले. मोदी यांनी बराक ओबामा यांच्याशी भेटण्यासाठी १० लाख रुपयांचा सुट घातला होता असे राहुल गांधी यांनी सांगितले. मोदी यांनी १५ लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन दिले होते, कुठे गेली ती रक्कम?., आम आदमी पार्टीचा एकच अजेंडा होता तो म्हणजे काँग्रेसला सत्तेवरुन खाली खेचणे हेच धोरण होते. केंद्रात काँग्रेसचे सरकार होते त्यावेळी केजरीवाल हे आंदोलन करीत सुटले होते. परंतू आता मात्र ते करीत नाही असे सांगायलाही राहुल गांधी विसरले नाहीत. दिल्ली ही देशाची राजधानी असून ती सर्वांची आहे. दिल्लीत काँग्रेसची सत्ता आल्यास सर्वांना सोबत घेवून दिल्लीचा विकास करु. प्रत्येक गरीब व्यक्तीला निवारा देण्यात येईल. कंत्राटी कामगारांना कायम सेवेत करण्यात येईल असे राहुल गांधी यांनी सांगितले.