येत्या 1 मे पासून दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती
By Admin | Updated: April 12, 2017 16:08 IST2017-04-12T15:24:56+5:302017-04-12T16:08:30+5:30
आंतरराष्ट्रीय तेल बाजारातील दरानुसार येत्या 1 मे पासून दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये बदल होणार आहे.

येत्या 1 मे पासून दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 12 - आंतरराष्ट्रीय तेल बाजारातील दरानुसार येत्या 1 मे पासून दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये बदल होणार आहे. आयओसी, भारत पेट्रोलियम लिमिटेड, हिंदुस्थान पेट्रोलियम लिमिटेड या सरकारी तेल कंपन्यांच्या मालकीचे जवळपास 58 हजार पेट्रोल पंप आहेत. येत्या 1 मे पासून निवडक पाच शहरात नियमित पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये बदल होतील.
हा प्रयोग यशस्वी झाल्यास हळूहळू संपूर्ण देशात अंमलबजावणी सुरु होईल असे पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले. आंध्रप्रदेशातील पुदूच्चेरी, विझाग, राजस्थानमधील उदयपूर, झारखंडमध्ये जमशेदपूर आणि चंदीगड या पाच शहरात प्रायोगिक तत्वावर दररोज पेट्रोल-डिझेलच्या किंमतीचा आढावा घेतला जाईल.
सध्या तेल कंपन्या दरमहिन्यात 1 आणि 16 तारखेला पेट्रोल-डिझेलच्या किंमतीचा आढावा घेतात. जून 2010 मध्ये सरकारने पेट्रोलच्या किंमती नियंत्रण मुक्त केल्या आणि किंमती ठरवण्याचा अधिकार तेल कंपन्यांना दिला. ऑक्टोंबर 2014 पासून डिझेलचे दर ठरवण्याचा अधिकार तेल कंपन्यांना मिळाला.