राजधानी दिल्लीत प्रचाराच्या तोफा थंडावल्या
By Admin | Updated: February 6, 2015 02:12 IST2015-02-06T02:12:56+5:302015-02-06T02:12:56+5:30
संपूर्ण देशाचे लक्ष वेधणाऱ्या राजधानी दिल्लीतील विधानसभा निवडणुकीच्या प्रचार तोफा गुरुवारी सायंकाळी थंडावल्या.

राजधानी दिल्लीत प्रचाराच्या तोफा थंडावल्या
गल्लीबोळा पिंजून काढल्या : सर्वच पक्षांकडून दिवसभर प्रचार; मतदारांपर्यंत पोहोचण्यात कोणतीही कसर राहू न देण्याचा आटापिटा
नवी दिल्ली : संपूर्ण देशाचे लक्ष वेधणाऱ्या राजधानी दिल्लीतील विधानसभा निवडणुकीच्या प्रचार तोफा गुरुवारी सायंकाळी थंडावल्या. एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोप, हेवेदावे, विविध पक्षांतील दिग्गज नेत्यांच्या सभा आणि रोडशोमुळे प्रचार काळात संपूर्ण राजधानी दणाणून गेली होती.
७ फेब्रुवारीला होणाऱ्या या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अचानक मुसंडी मारणाऱ्या आम आदमी पार्टीला रोखण्याकरिता भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेचा पुरेपूर वापर केला. शेवटच्या दिवशी नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातील आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांचा रोड शो आणि सुलतानपूर माजरामधील काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या रोड शोसोबतच विविध पक्षांच्या नेत्यांनी सुमारे १०० सभा घेतल्या. अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या या निवडणूक प्रचारात राजकीय पक्षांनी एकमेकांवर घणाघाती प्रहार केले. चिखलफेकही केली. सायंकाळी प्रचार तोफा थंडावल्यानंतर आता मोठ्या पक्षांचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन मते मागत आहेत.
गेल्या १६ वर्षांपासून दिल्लीच्या तख्तापासून वंचित राहिलेल्या भाजपने यावेळी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या टीममधील माजी सहकारी किरण बेदी यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार बनवून मोठी राजकीय खेळी खेळली आहे. अर्थात बेदींच्या उमेदवारीने पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांमध्येही असंतोष निर्माण झाल्याचे सांगितले जाते. भाजपच्या या डावपेचांचा केजरीवाल यांच्या नेतृत्वातील आपने संपूर्ण ताकदीने सामना केला. आतापर्यंत प्रसिद्ध निवडणूकपूर्व सर्वेक्षणांमध्ये डिसेंबर २०१३ पर्यंत १५ वर्षे राजधानीवर शासन करणारी काँग्रेस तिसऱ्या स्थानावर राहील, असे भाकीत वर्तविण्यात आले आहे. काही चाचण्यांनुसार आपला स्पष्ट बहुमत मिळण्याचे संकेत आहेत. तर काहींनी भाजपच्या विजयाचा अंदाज बांधला आहे.
(लोकमत न्यूज नेटवर्क)
आमच्यासोबत देवच आहे- केजरीवाल
महाभारतातील दुर्योधनाप्रमाणे त्यांच्याकडे सर्व प्रशासकीय यंत्रणा आहे, आमच्यासोबत केवळ देवच (भगवान कृष्ण) आहे, असे सांगत आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी मतदारांना भावनिक साद घातली आहे.
दुसऱ्यांवर हल्ला करण्याचा त्यांचा धर्म आहे. दुर्योधनाप्रमाणे सर्व यंत्रणा त्यांच्याकडे (भाजप) आहे, असे ते म्हणाले. दिल्ली निवडणूक अवघ्या दोन दिवसांवर आली असताना प्रचार शिगेला पोहोचला आहे. बुधवारी भाजपच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी दिल्लीकरांच्या उदंड प्रेमाबद्दल आभार व्यक्त करताना भावुक झाल्या होत्या. केजरीवालांनी आज नवी दिल्लीतील मंदिर मार्ग भागातून प्रचाराला सुरुवात केली. ‘कुछ अद्भुतही हो रहा है’ असे सांगत त्यांनी दिल्लीकरांचा प्रतिसाद अविश्वसनीय असल्याची बाब टिष्ट्वटरवर नमूद केली. आमचा पक्ष सत्याच्या मार्गावर आहे, असे ते म्हणाले.
त्यामुळेच देव आमच्यासोबत आहे. दुसऱ्यांवर हल्ला करणे हा भाजपचा धर्म आहे, असेही ते म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
आधुनिक महाभारत
केजरीवालांनी टिष्ट्वटरवर महाभारताचा प्रसंग उभा केला. दुर्योधनाने श्रीकृष्णाला सैनिक मागितले होते. दुसरीकडे अर्जुनाने केवळ श्रीकृष्णाची मदत मागितली होती, असे सांगत त्यांनी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा भाजपसोबत असल्याचा उल्लेख केला.
त्यांच्याकडे फारसा अनुभव नाही -बेदी
दिल्ली विधानसभा निवडणूक प्रचाराच्या आजच्या (गुरुवारी) अंतिम दिनी भाजपच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी या आम आदमी पार्टीचे (आप) संयोजक अरविंद केजरीवाल आणि स्वत:च्या प्रशासकीय अनुभवाची तुलना करताना दिसल्या़ मी आयुष्यातील ४० वर्षे प्रशासकीय सेवेत घातली आहेत़ याउलट आप प्रमुखांकडे उणापुरा पाच वर्षांचा प्रशासकीय अनुभव आहे, असे बेदी म्हणाल्या़
किराडी विधानसभा मतदारसंघातील रॅलीत बेदींनी केजरीवालांवर थेट हल्ला चढवला़ माझ्याकडे प्रशासकीय सेवेचा ४० वर्षांचा अनुभव आहे व केजरीवालांकडे केवळ पाच वर्षांचा अनुभव आहे़ केजरीवाल आयत्या वेळी पळ काढणारे आहेत़ ते पुन्हा पळ काढू शकतात, अशा शब्दांत त्यांनी केजरीवालांवर हल्ला चढवला़ माझ्याविरुद्ध नकारात्मक प्रचार सुरू आहे;पण त्याकडे लक्ष देऊ नका़, असे त्या म्हणाल्या.
माझ्याकडे दिल्लीकरांचा लाभ होईल असे दोन मुद्दे आहेत़ मी या ठिकाणी कुणाचेही नुकसान करायला आलेली नाही़ मग तो फेरीवाला असो, व्यापारी असो वा स्वच्छता कर्मचारी़ माझ्याविरुद्ध पसरविण्यात येणाऱ्या नकारात्मक गोष्टी खोट्या आहेत, असे बेदी म्हणाल्या़ महिलांची सुरक्षा आणि राज्यातील सुव्यवस्था आपल्यासाठी प्राधान्यक्रमाचे मुद्दे असल्याचेही त्यांनी आपल्या भाषणात सांगितले़