कर्ज काढून देण्याची बतावणी

By Admin | Updated: June 3, 2017 01:55 IST2017-06-03T01:55:26+5:302017-06-03T01:55:26+5:30

कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली १० महिलांकडून प्रत्येकी २० हजार रुपये घेऊन त्यांची फसवणूक

Pretender | कर्ज काढून देण्याची बतावणी

कर्ज काढून देण्याची बतावणी

दोन लाख रुपये हडपले : १० महिलांना गंडा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली १० महिलांकडून प्रत्येकी २० हजार रुपये घेऊन त्यांची फसवणूक करणाऱ्या दोन महिलांविरुद्ध सदर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. किरण आशिष मेश्राम (रा. न्यू बिडीपेठ, सक्करदरा) आणि नेहा ऊर्फ जेनब साहिल खान (वय ३७, रा. एमजी कॉलनी नंदनवन) अशी आरोपींची नावे आहेत.
आरोपी महिलांचे सदरमधील उत्कर्ष निर्माण मंगळवारी बाजार येथे कार्यालय होते. विविध भागातील महिलांच्या भेटी घेऊन आरोपी किरण आणि नेहा त्यांना नाबार्डकडून कर्ज मिळवून देण्याची बतावणी करीत होत्या. तत्पूर्वी कागदपत्रे तयार करण्यासाठी आणि अन्य बाबींसाठी खर्च येतो, असे सांगून त्या कर्ज मिळविण्याच्या प्रयत्नात अनेक महिला किरण आणि नेहाच्या हातात हजारोंची रक्कम ठेवत होत्या. सुमन गुलाबचंद राहांगडाले (वय ४५, रा. इसासनी, हिंगणा) आणि त्यांच्या सोबतच्या नऊ महिलांनी अशाच प्रकारे लाखोंचे कर्ज मिळते म्हणून आरोपी किरण आणि नेहाला प्रत्येकी २० हजार रुपये दिले. ही रक्कम घेतल्यानंतर १ जून २०१६ ते १ जून २०१७ पर्यंत प्रत्येक वेळी वेगवेगळे कारण सांगून आरोपी किरण आणि नेहा पैसे देणाऱ्या महिलांना टाळत होत्या. त्या कर्ज मिळवून देऊ शकत नाही, हे ध्यानात आल्यामुळे राहांगडाले आणि अन्य महिलांनी आपली रक्कम परत मागितली असता आरोपी महिलांनी त्यांना प्रतिसाद देणे बंद केले. त्यांनी फसवणूक केल्याचे लक्षात आल्यामुळे राहांगडाले आणि अन्य नऊ महिलांनी सदर पोलिसांकडे तक्रार नोंदवली. उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे पोलिसांनी किरण आणि नेहाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पुढील चौकशी सुरू आहे.

अनेकींना गंडा
या दोघींनी केवळ १० महिलांना नव्हे तर अशाच प्रकारे विविध भागातील अनेक महिलांना गंडा घातल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलीस त्यानुषंगानेही या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

 

Web Title: Pretender

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.