राष्ट्रपती निवडणुकीत मतदानादरम्यानच विरोधी पक्षांनी मानली हार?
By Admin | Updated: July 17, 2017 16:29 IST2017-07-17T16:29:46+5:302017-07-17T16:29:46+5:30
एकीकडे सत्ताधारी पक्षांचे नेते विजयी अविर्भावात प्रतिक्रिया देत असताना दुसरीकडे विरोधी पक्षांच्या नेत्यांचे अवसान गळाल्याचे चित्र दिसत होते.

राष्ट्रपती निवडणुकीत मतदानादरम्यानच विरोधी पक्षांनी मानली हार?
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 17 - राष्ट्रपती निवडणुकीसाठी आवश्यक संख्याबळ आधीच जमवल्याने राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये मतदानादिवशी विजयाबाबत निश्चिंतता दिसत आहे. तर ही निवडणूक म्हणजे वैचारिक लढाई असल्याची गर्जना करणारे काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी मतदानादरम्यानच शस्त्रे खाली टाकल्याचे चित्र दिसत आहे. एकीकडे सत्ताधारी पक्षांचे नेते विजयी अविर्भावात प्रतिक्रिया देत असताना दुसरीकडे विरोधी पक्षांच्या नेत्यांचे अवसान गळाल्याचे चित्र दिसत होते. त्यातच काही ठिकाणी क्रॉस व्होटींग झाल्याने विरोधी पक्षांसाठी परिस्थिती अधिकच बिकट बनली.
शिवपाल, मुलायम यांचा कोविंद यांना पाठिंबा
समाजवादी पक्षाचे नेते शिवपाल यादव यांनी सांगितले की ते आणि मुलायम सिंह यादव रालोआचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना पाठिंबा देणार आहेत. मीरा कुमार यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेताना आमचे मत विचारात घेतले नव्हते. कोविंद सेक्युलर व्यक्ती आहेत, त्यामुळे आम्ही त्यांना पाठिंबा देऊ, त्यामुळे शिवपाल आणि मुलायम यांच्या समर्थकांनीही कोविंद यांना मतदान केल्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी म्हणते कोविंद जिंकणार
राष्ट्रपतिपदासाठी आज सुरू असलेल्या मतदानादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी रालोआचे उमेदवार रामनाथ कोविंद मोठ्या मताधिक्याने निवडून येतील अशी शक्यता वर्तवली. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार आणि खासदारांनी मीरा कुमार यांना मत दिल्याचे त्यांनी सांगितले.
त्रिपुरामध्ये क्रॉस व्होटिंग
एकीकडे तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नरेंद्र मोदी आणि भाजपाला कडाडून विरोध करत आहेत. मात्र राष्ट्रपती निवडणुकीत त्यांच्या पक्षाच्या आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याचे वृत्त आहे. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी डाव्या पक्षांना सोबत घेण्यात आल्याने तृणमूल काँग्रेसच्या त्रिपुरा येथील आमदारांनी मीरा कुमार यांच्याऐवजी कोविंद यांना मतदान करण्याचा निर्णय घेतला.
आणखी वाचा
देशातील सर्वोच्च पद असलेल्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी सकाळी 10 वाजता संसदेत मतदान केले. भाजपाच्या नेतृत्वाखाली रालोआचे उमेदवार रामनाथ कोविंद यांचे पारडे जड मानले जात आहे. विरोधकांच्या उमेदवार मीरा कुमार यांच्याकडून प्रादेशिक पक्षांचे समर्थन मिळविण्याचा प्रयत्न अखेरपर्यंत सुरू आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतांचे एकूण मूल्य 10,98,882 असून, विजयासाठी 5,49,442 आवश्यक आहे. राम नाथ कोविंद सहज आणि चांगल्या मताधिक्क्याने विजयी होतील अशा विश्वास केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केला आहे.
राष्ट्रपतिपदाचे रालोआचे उमेदवार रामनाथ कोविंद ६२ टक्क्यांहून अधिक मतांसह सहजपणे निवडून येऊ शकतात असा अंदाज आहे. तथापि, त्यांच्या मतांची टक्केवारी विद्यमान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना २०१२ मध्ये मिळालेल्या ६९ टक्के मतांहून कमी असेल.
राष्ट्रपतिपदासाठी पहिल्यांदाच दलित विरुद्ध दलित अशी लढाई होत आहे. आकडे भाजपच्या बाजूने असून, त्यांच्या उमेदवाराला जवळपास सात लाख मते मिळू शकतात. ही संख्या १० लाख ९८ हजार ९०३ मतांच्या सुमारे दोन तृतीयांश आहे.