मध्यप्रदेशमधील शालेय पुस्तकातील प्रताप, म्हणे मुशर्रफ महापुरुष
By Admin | Updated: July 19, 2015 15:33 IST2015-07-19T15:33:25+5:302015-07-19T15:33:25+5:30
मध्यप्रदेशमधील जबलपूर येथील तिसरीच्या शालेय पाठ्यपुस्तकात पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ हे महापुरुष असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

मध्यप्रदेशमधील शालेय पुस्तकातील प्रताप, म्हणे मुशर्रफ महापुरुष
ऑनलाइन लोकमत
भोपाळ, दि. १९ - मध्यप्रदेशमधील जबलपूर येथील तिसरीच्या शालेय पाठ्यपुस्तकात पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ हे महापुरुष असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. स्थानिक वकिलांनीच हा प्रकार समोर आणला असून याप्रकरणाची जिल्हाधिका-यांकडे तक्रार दाखल करणार आली आहे.
जबलपूरमधील तिसरी इयत्तेच्या मुल्यशिक्षण, सामान्य ज्ञान व योग हे पुस्तक दिल्लीतील गायत्री पब्लिकेशनने छापले असून पंकज जैन हे या पुस्तकाचे लेखक आहेत. या पुस्तकाच्याआठव्या धड्यात सहा जणांचे छायाचित्र असून या महापुरुषांना ओळखा असा उल्लेख करण्यात आला आहे विशेष म्हणजे या पुस्तकाला एनसीईआऱटीची मंजुरी मिळाल्याने प्रशासनाचा हलगर्जीपणा समोर आला आहे. कारगिल युद्धासाठी कारणीभूत ठरणारे व वारंवार भारतविरोधी भूमिका घेणा-या मुशर्रफ यांचा महापुरुष म्हणून उल्लेख करण्यावर जबलपूर जिल्हा बार असोसिएशनने आक्षेप घेतला. असोसिएशनचे सदस्य अमित सहा यांनी याप्रकरणी थेट जिल्हाधिका-यांकडे तक्रार दाखल केली आहे. एनसीईआऱटीने या पुस्तकाला मंजुरी दिलेली नाही असे सांगत राज्य सरकारने अशा प्रकाशकांवर कारवाई करावी अशी प्रतिक्रिया एनसीईआरटीचे गौतम गांगुली यांनी सांगितले.