-एस.पी. सिन्हा, पाटणाPrashant Kishor Constituency: पूर्वीचे राजकीय रणनीतीकार आणि सध्या सक्रिय राजकारणात उतरलेल्या प्रशांत किशोर यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली. बिहारमधील रोहतास जिल्ह्यात असलेल्या करगहर विधानसभा मतदारसंघातून ते निवडणूक लढवणार आहेत.
पाटण्यामध्ये आयोजित एका कार्यक्रमात प्रशांत किशोर यांनी याबद्दलची घोषणा केली.
प्रशांत किशोर यांना तुम्ही कोणत्या मतदारसंघातून लढणार आहात? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, "सर्वांना सांगतोय की, दोन मतदारसंघातून लढायला हवं. एक कर्मभूमि आणि दुसरं जन्मभूमी. जर जन्मभूमीबद्दल सांगायचं, तर करगहर माझी जन्मभूमी आहे आणि मला तिथून निवडणूक लढवायला आवडेल."
करगहर मतदारसंघात ब्राह्मणांचं प्राबल्य जास्त
करगहर विधानसभा मतदारसंघ ब्राह्मणाचं प्राबल्य असलेला मतदारसंघ आहे. २०२० मध्ये या मतदारसंघातून काँग्रेसचे संतोष मिश्रा विजयी झाले होते. तर जदयूचे वशिष्ठ सिंह दुसऱ्या क्रमांकावर राहिले.
यावेळी या मतदारसंघातून जदयूचे दिनेश राय निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. भोजपुरी गायक रितेश पांडेय सुद्धा करगहरमधून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. पण, जन सुराज्य पक्षाचे नेते प्रशांत किशोर यांनी आधीच या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. "मी दीर्घकाळापासून बिहारच्या राजकारणाकडे बघत आहे. आता बदल होण्याची गरज आहे आणि याची सुरूवात करगहरपासून होणार आहे. जनतेला जे वचन दिलं आहे, ते पूर्ण करण्यासाठी मी राजकारणात आलो आहे", असे प्रशांत किशोर म्हणाले.
करगहर मतदारसंघ राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा
बिहारच्या राजकारणामध्ये हा मतदारसंघ महत्वाचा मानला जातो. येथील जातीय समीकरणं आणि स्थानिक मुद्दे विजयाचे गणित ठरवतात. त्यात यावेळी प्रशांत किशोर मैदानात उतरले तर निवडणूक आणखी रंगतदार होताना दिसेल.
२०२० च्या आकडेवारीनुसार या मतदारसंघात ३,२४,९०६ मतदार आहेत. २०२० मधील विधानसभा निवडणुकीत ५९.८५ टक्के मतदान झाले होते. यावेळी प्रशांत किशोरच निवडणुकीच्या रिंगणात उतरले असल्याने विरोधक आणि सत्ताधाऱ्यांची चिंता वाढली आहे.