११० प्रवाशांना वाचवून सोडला प्राण
By Admin | Updated: November 4, 2014 14:16 IST2014-11-04T02:12:13+5:302014-11-04T14:16:56+5:30
तामिळनाडूच्या उधगमंडलमपासून ७० कि.मी. अंतरावरील पांडालूरजवळच्या वर्दळीच्या घाटरोडवर ही हृदय हेलावून टाकणारी घटना घडली.

११० प्रवाशांना वाचवून सोडला प्राण
उधगमंडलम : बस चालविताना अचानक हृदयविकाराचा तीव्र धक्का बसलेल्या एका बस चालकाने खऱ्या अर्थाने मृत्यूला काही क्षण चकवत बस कशीबशी रस्त्याच्या कडेला थांबविली आणि सर्व ११० प्रवासी सुरक्षित असल्याची खात्री पटल्यानंतरच स्वत:ला मृत्यूच्या स्वाधीन केले. तामिळनाडूच्या उधगमंडलमपासून ७० कि.मी. अंतरावरील पांडालूरजवळच्या वर्दळीच्या घाटरोडवर ही हृदय हेलावून टाकणारी घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अब्दुल रहमान (४५) या बसचालकाला बस चालवीत असताना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला. त्याच्या छातीत असह्य कळा येऊ लागल्या. तो घामाघूम झाला. आपण मरणार हे लक्षात आल्यावर त्याने प्रवाशांना वाचविण्याचा प्रयत्न केला. अशा गंभीर अवस्थेतही अब्दुलने बसवरचा ताबा सोडला नाही आणि वेग कमी करीत बस रस्त्याच्या कडेला नेऊन उभी केली आणि त्यानंतर लगेच प्राण सोडला. ही बस ११० प्रवाशांना घेऊन सुलतान बॅटरीवरून पांडालूरला जात होती. (वृत्तसंस्था)