Prakash Ambedkar on PM Modi: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातून संतापाची लाट उसळली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर देण्याचे आश्वासन दिल्यानंतर प्रत्येकजण काय कारवाई होणार याकडे लक्ष लावून आहे. दुसरीकडे पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारत कठोर पावले उचलताना दिसत आहे.अशातच पंतप्रधान मोदींनी दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी लष्कराला मोकळीक दिल्याचे म्हटलं जात आहे. त्यामुळे दहशतवाद्यांवर कारवाई करण्यासाठी आता लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य असण्याची शक्यता आहे. मात्र यावरुनच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबडेकर यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. पंतप्रधानांना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नसल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं.
पहलगाममध्येएका नेपाळी नागरिकासह २६ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले होते. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत लष्कराच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास व्यक्त केला. पाकिस्तानला कसे उत्तर द्यायचे, लक्ष्य काय असेल, पद्धत आणि वेळ काय असेल आणि कोणता निर्णय कधी घ्यायचा हे लष्कर स्वतः ठरवेल. आता त्यांना सरकारकडून मोकळीक आहे, असे आदेश पंतप्रधानांनी दिल्याचे म्हटलं जात आहे. अशातच प्रकाश आंबेडकर यांनी लष्कराला फ्री हॅन्ड देऊन पंतप्रधान मोदी जबाबदारीपासून बाजूला झाल्याचे म्हटलं.
"भारताचे राष्ट्रपती हे भारतीय सशस्त्र दलांचे सर्वोच्च कमांडर असतात, पंतप्रधान नाही. म्हणून, पंतप्रधानांनी "फ्री हॅन्ड" दिला आहे असे म्हणणे चुकीचे आहे. त्यांना ते करण्याचा अधिकार नाही. राष्ट्रपतींना लष्करी कारवाईची शिफारस करणे हे मंत्रिमंडळाचे काम आहे. पंतप्रधान एकटे हा निर्णय घेऊ शकत नाहीत. दुसरे म्हणजे, ही "फ्री हॅन्ड" दिला म्हणजे मोदींनी स्वतःला जबाबदारीतून मुक्त करण्याचे काम केले आहे. भारतीय सैन्य आपले काम खूप चांगले करते आणि ते कधीही पंतप्रधानांवर अवलंबून राहिलेले नाही. लष्करी निर्णय हे राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ यांच्यातील सहयोगी प्रक्रियेतून होत असतात. मंत्रिमंडळ आणि विरोधी पक्षाच्या अनुपस्थितीत ही बैठक झाली याचे मला आश्चर्य वाटते. मोदी राष्ट्रपती का होऊ पाहत आहेत? जसे "पाणी थांबवले" हा जुमला होता, तसेच हा "फ्री हॅन्ड" देखील आहे! उद्या जर भारताने पाकिस्तानविरुद्ध लष्करी कारवाई केली तर त्याचे श्रेय फक्त आणि फक्त भारतीय सशस्त्र दलांनाच गेलं पाहिजे," असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कॅबिनेट सुरक्षा समितीची बैठक घेतल्यानंतर सरकारने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाची पुनर्रचना केली . राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे अध्यक्ष म्हणून माजी रॉ प्रमुख आलोक जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माजी वेस्टर्न एअर कमांडर एअर मार्शल पी.एम. सिन्हा, माजी दक्षिणी लष्कर कमांडर लेफ्टनंट जनरल ए.के. सिंग आणि रिअर अॅडमिरल मोंटी खन्ना हे लष्करी सेवेतील निवृत्त अधिकारी आहेत.