प्रफुल्ल पटेल लवकरच राज्यसभेवर

By Admin | Updated: May 21, 2014 02:57 IST2014-05-21T02:57:08+5:302014-05-21T02:57:08+5:30

मावळते केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांची लवकरच राज्यसभेवर निवड केली जाणार आहे.

Praful Patel to Rajya Sabha soon | प्रफुल्ल पटेल लवकरच राज्यसभेवर

प्रफुल्ल पटेल लवकरच राज्यसभेवर

यदु जोशी/ गजानन जानभोर, नवी दिल्ली - मावळते केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांची लवकरच राज्यसभेवर निवड केली जाणार आहे. मावळते केंद्रीय राज्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते तारिक अन्वर यांच्या जागी ते राज्यसभेवर जातील, असे विश्वसनीय सूत्रांनी आज सांगितले. तारिक अन्वर हे राज्यसभेचे विद्यमान सदस्य आहेत. मात्र अलीकडे ते बिहारमधून लोकसभेवर निवडून आलेले आहेत. त्यामुळे त्यांची राज्यसभेची जागा रिक्त होणार असून, त्या जागी पटेल यांना राज्यसभेवर पाठविण्याचा निर्णय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार लवकरच जाहीर करतील, अशी माहिती आहे. पटेल हे पवार यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात. तारिक अन्वर यांची १० जुलै २०१० रोजी महाराष्ट्र विधानसभेतून राज्यसभेवर निवड झाली होती. त्यांचा राज्यसभा सदस्यत्वाचा कार्यकाळ १० जुलै २०१६ पर्यंत असेल. त्यांच्या जागी आता पटेल निवडून गेल्यास त्यांचा राज्यसभा सदस्यत्वाचा कार्यकाळ दोन वर्षांचा असेल. या जागेसाठी लवकरच निवडणूक जाहीर होणार आहे. सूत्रांनी सांगितले, की दीर्घकाळापासून आपल्यासोबत असलेले पटेल यांना सन्मानाने पुन्हा दिल्लीत आणण्यास पवार इच्छुक आहेत. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागत असतानाच त्यांनी पटेल यांना फोन करून काळजी करू नका, तारिक अन्वर कटियारमध्ये आघाडीवर आहेत. तुमचा लोकसभेचा निकाल विपरीत लागला तरी तुम्हाला तारिक यांच्या जागी राज्यसभेवर पाठवू, या शब्दांत आश्वस्त केले होते.

Web Title: Praful Patel to Rajya Sabha soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.