मीडियामध्ये देश घडवण्याची ताकद - पंतप्रधान नरेंद्र मोदी
By Admin | Updated: October 25, 2014 13:03 IST2014-10-25T12:28:35+5:302014-10-25T13:03:09+5:30
मीडियामध्ये देश घडवण्याची मोठी ताकद आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मीडियाचे कौतुक केले.

मीडियामध्ये देश घडवण्याची ताकद - पंतप्रधान नरेंद्र मोदी
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २५ - देशातील जनमानसांत संदेश पोचवण्यासाठीचे अतिशय प्रभावी माध्यम असणा-या प्रसारमाध्यमांमध्ये देश बदलण्याची, घडवण्याची मोठी ताकद आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मीडियाचे कौतुक केले. दिवाळीनिमित्त दिल्लीतील भाजपा कार्यालयात 'दिवाळी मिलन' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी पंतप्रधानांनी पत्रकारांशी संवाद साधला. भाऊबीज व नववर्षानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतानाच मोदींनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. या कार्यक्रमास भाजपाध्यक्ष अमित शहा, गृहमंत्री राजनाथ सिंग,परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्यसह भाजपाचे महत्वाचे नेते उपस्थित होते.
याआधीही आपली ब-याच वेळा भेट झाली आहे, मी गुजरातमध्ये असतानाही अनेक वेळा तुम्हाला भेटलो आहे. पत्रकार मित्रांशी असलेली ओळख दृढ करण्याचा माझा प्रयत्न आहे, असे मोदी म्हणाले. गेल्या महिन्याभरापासून आपण 'स्वच्छ भारत अभियाना'बाबतचे लिखाण वाचत असून पत्रकारांनी स्वच्छता, आरोग्यावर सातत्याने लेख लिहीले, त्यांच्या टीकेमुळे स्वच्छतेचा विषय चर्चेत राहिला असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील सरकार, जनताही जागृत झाली असून ही एकप्रकारे देशसेवाच आहे असे सांगत मीडियामध्ये देश घडवण्याची मोठी ताकद असते, असे ते म्हणाले. फक्त हातात झाडू घेऊन सफाई करायला लागणेच महत्वाचे नाही, तर पत्रकारांची लेखणी हा एकप्रकारचा झाडूच असून तोही स्वच्छतेचे साधन बनला आहे, अशी शब्दांत त्यांनी मीडियाचे कौतुक केले.