जेएनयूत झळकले 'आझाद काश्मीर'चे पोस्टर्स
By Admin | Updated: March 3, 2017 09:16 IST2017-03-03T08:36:00+5:302017-03-03T09:16:46+5:30
वादग्रस्त पोस्टर्स लावले असल्याची माहिती मिळताच प्रशासनाने सुरक्षा विभागाला कळवत हे पोस्टर्स हटवण्यास सांगितलं.

जेएनयूत झळकले 'आझाद काश्मीर'चे पोस्टर्स
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 3 - जवाहरलाल नेहरु विद्यापीठात स्वतंत्र काश्मीरची मागणी करणारे वादग्रस्त पोस्टर्स लावण्यात आले होते. काही विद्यार्थ्यांनी स्कूल ऑफ सोशल सायन्सच्या भिंतींवर हे पोस्टर्स पाहिल्यानंतर प्रशासनाला यासंबंधी माहिती दिली. 'काश्मीरसाठी स्वातंत्र्य, मुक्त पॅलेस्टाईन, स्वनिर्णयाचा अधिकार' असं या वादग्रस्त पोस्टर्सवर लिहिण्यात आलं होतं. डाव्या विचारसरणीचे डेमोक्रॅटिक विद्यार्थी संघटनेने (डीएसयू) हो पोस्टर्स लावले होते. वादग्रस्त पोस्टर्स लावले असल्याची माहिती मिळताच प्रशासनाने सुरक्षा विभागाला कळवत हे पोस्टर्स हटवण्यास सांगितलं.
डेमोक्रॅटिक विद्यार्थी संघटना (डीएसयू) म्हणजे तोच गट आहे ज्याचे माजी सदस्य उमर खालीद, अनिर्बन भट्टाचार्य आणि इतरांनी 9 फेब्रुवारी 2016 रोजी संसद हल्ल्याचा मास्टरमाइंड अफजल गुरु आणि काश्मीरी फुटीरवादी मकबूल भट यांच्या फाशीविरोधात मोर्चाचं आयोजन केलं होतं. या मोर्च्यात देशविरोधी घोषणा देण्यात आल्याने वाद चिघळला होता. ज्यानंतर पोलिसांनी काही विद्यार्थ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंद केला होता.
डाव्या विचारसणीशी संलग्न असलेल्या पण डीएसयूशी संबंधित नसलेल्या विद्यार्थ्यांच्या एका गटाने सांगितलं आहे की, ' हे पोस्टर्स गेल्या तीन ते चार दिवसांपासून येथे आहेत. मात्र यामध्ये काही नवीन नसून सुरुवातीपासून अधेमधे असे पोस्टर्स झळकत असतात'.
'विद्यापीठाचा महत्वाचा वेळ आणि ऊर्जा अशा विनाकारण आणि क्षुल्लक अशा वादांमुळे वाया जाते. काही छोटे गट अजूनही वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात हे दुर्भाग्यपूर्ण आहे. शैक्षणिक वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न केला जात आहे', असं जेएनयूमधील एका वरिष्ठ अधिका-याने सांगितलं आहे.