पूनम महाजन, प्रीतम मुंडे यांना बैठकीत उभे केले!
By Admin | Updated: March 18, 2015 02:11 IST2015-03-18T02:11:56+5:302015-03-18T02:11:56+5:30
सभागृहात महत्त्वाच्या प्रसंगी गैरहजर राहणाऱ्या भाजपाच्या दांडीबहाद्दर खासदारांना खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी संसदीय पक्षाच्या बैठकीत खडे बोल सुनावले.
पूनम महाजन, प्रीतम मुंडे यांना बैठकीत उभे केले!
भाजपा संसदीय पक्ष बैठक : दांडीबहाद्दर खासदारांना नरेंद्र मोदींनी दिली समज
नवी दिल्ली : सभागृहात महत्त्वाच्या प्रसंगी गैरहजर राहणाऱ्या भाजपाच्या दांडीबहाद्दर खासदारांना खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी संसदीय पक्षाच्या बैठकीत खडे बोल सुनावले. मुंबईच्या खासदार पूनम महाजन आणि बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनाही झाडाझडतीला सामोरे जावे लागले. भर बैठकीत उभे करून त्यांची कानउघाडणी केली.
लोकसभेत भूसंपादन विधेयकावरील मतदानावेळी अनुपस्थित राहिलेल्या पक्षाच्या वीसही खासदारांना मोदींनी या बैठकीत चांगलेच फैलावर घेतले. यात पूनम महाजन, प्रीतम मुंडे, वरुण गांधी, बाबूल सुप्रीयो आदींचा समावेश होता. खुद्द मोदींनी सर्वांना बघू तरी द्या, असे म्हणत, या सर्व दांडीबहाद्दरांना भर बैठकीत उभे राहण्यास सांगितले. मोदींच्या आदेशानंतर सर्व खासदार निमूटपणे आपल्या जागेवर उभे झाले. जनतेने याचसाठी तुम्हाला निवडून दिले का? असा थेट सवाल मोदींनी त्यांना केला.