सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूवरून राजकारण
By Admin | Updated: July 3, 2014 04:54 IST2014-07-03T04:54:42+5:302014-07-03T04:54:42+5:30
माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यू प्रकरणाला अचानक नवी कलाटणी मिळाली आहे़

सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूवरून राजकारण
नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यू प्रकरणाला अचानक नवी कलाटणी मिळाली आहे़ चुकीचा शवविच्छेदन अहवाल देण्यासाठी तत्कालीन आरोग्यमंत्री गुलामनबी आझाद आणि शशी थरूर यांचा प्रचंड दबाव होता, असा खळबळजनक दावा अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (एम्स) वरिष्ठ फॉरेन्सिक डॉक्टरसुधीर गुप्ता यांनी केला आहे़ त्यातच भाजपा नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनीही
सुनंदा यांना अतिशय ‘प्रोफेशनल’ पद्धतीने मारण्यात आल्याच्या
आपल्या आरोपाचा पुनरुच्चार केला आहे़
दरम्यान, एम्सने गुप्ता यांचा दावा खोडून काढला असून त्यात काहीही तथ्य नसल्याचे म्हटले आहे़ सरकारने मात्र गुप्ता यांच्या आरोपाची गंभीर दखल घेत, एम्सच्या संचालकांकडून सविस्तर अहवाल मागवला आहे़ डॉ़ सुधीर गुप्ता हे एम्सच्या फॉरेन्सिक विज्ञान विभागाचे प्रमुख आहेत़ सुनंदा यांचे शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांच्या चमूचे प्रमुख राहिलेल्या गुप्ता यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री तसेच सेंट्रल अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनलला (कॅट) पत्र लिहिले आहे़ यासंदर्भात गुप्ता यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला़
गत १७ जानेवारीला शशी थरूर केंद्रीय मंत्री असताना त्यांच्या पत्नी सुनंदा थरूर या नवी दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलात मृतावस्थेत आढळून आल्या होत्या़
तणाव कमी करणाऱ्या औषधांच्या अतिसेवनाने त्यांचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात म्हटले होते़ मृत्यूपूर्वी टिष्ट्वटरवर सुनंदा व पाकिस्तानी महिला पत्रकार मेहेर तरार यांच्यात वाद झाला होता़
शशी थरूर व मेहेर यांच्यात कथितरीत्या प्रेमसंबंध असल्याचा संशय सुनंदा यांना होता़ मेहेर यांनी मात्र हे आरोप फेटाळले होते़ (लोकमत न्यूज नेटवर्क)