चंदीगढ : पंजाबमध्ये कॅबिनेट मंत्री असलेले नवज्योत सिंह सिद्धू यांच्या पत्नीने काँग्रेससमोर मोठी समस्या निर्माण केली आहे. येत्या लोकसभा निवडणुकीवेळी चंदीगढ मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. यासाठी त्यांनी पक्षाकडे तसा अर्जही दिला आहे. यामुळे चंदीगढच्या जागेसाठी प्रयत्न करणाऱ्या दिग्गज नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. माजी केंद्रीय मंत्री पवन बंसल आणि मनीष तिवारी या जागेचे प्रबळ दावेदार होते.
डॉ. नवज्योत कौर सिद्धू या शुक्रवारी अचानक चंदीगढमधील काँग्रेस भवनामध्ये हजर झाल्या. यावेळी त्यांनी चंदीगढ काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप छाबड़ा यांच्याकडे लेखी अर्ज देत लोकसभेसाठी उमेदवारी देण्याची इच्छा व्यक्त केली. महत्वाचे म्हणजे, रविवारी सायंकाळीच पवन बंसल यांचे नाव लोकसभा जागेसाठी देण्याचा प्रस्ताव संमत करण्यात आला होता.