इंजेक्शनद्वारे देण्यात येणार पोलिओची लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2016 06:56 IST2016-04-27T06:56:59+5:302016-04-27T06:56:59+5:30
देश पोलिओमुक्त झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने २७ मार्च २०१४ ला जाहीर केले.

इंजेक्शनद्वारे देण्यात येणार पोलिओची लस
नवी दिल्ली- देश पोलिओमुक्त झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने २७ मार्च २०१४ ला जाहीर केले. त्यानंतर पी १ आणि पी ३ विषाणूबाधित रुग्णांसाठी केंद्र शासन आणि राज्य शासनाने पोलिओ लसीकरणात बदल केले आहेत. आता पी १ आणि पी ३ च्या विषाणूंसाठी बालकांना पोलिओ इंजेक्शन (आय.पी.व्ही) देण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
२५ एप्रिलपासून देशभरात ही लसीकरण पद्धत सुरु करण्यात आली आहे. बालकांना मुखावाटे देणाऱ्या पोलिओ लसीच्या पहिल्या व तिसऱ्या डोसाबरोबर पोलिओ इंजेक्शन ही लस देण्यात येणार आहे. ही लस ०.१ मी.ली उजव्या दंडावर इंजेक्शनद्वारे दिली जाते. त्यामुळे बालकांना पोलिओ रोगापासून दुहेरी संरक्षण मिळणार आहे. या दोन्ही लसी एकत्रितपणे पोलिओ रोगाचा पुर्न:उद्भव आणि पुर्न: संसर्ग रोखता येणार असल्याचे महापालिका आरोग्य कार्यकारी अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी स्पष्ट केले.
पोलिओ हा आजार पी १, पी २ आणि पी ३ या तीन विषाणूंमुळे होतो. तीन वर्षांत देशात एकही पोलिओचा नवीन रुग्ण आढळून न आल्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने देशाला ‘पोलिओमुक्त घोषित’ केले. सध्या देशात पोलिओच्या रुग्णांमध्ये पी १ विषाणू बाधित रुग्णांची संख्या अधिक असून पी ३ विषाणू बाधित रुग्णदेखील आहेत. आता पी २ विषाणूमुळे पोलिओ होण्याचा धोका राहिलेला नाही. या आधी ३ लसी एकत्र करुन दिल्या जात होत्या. आता २ लसी एकत्र करुन दिल्या जाणार आहेत.