एका कबुतरने उडवली पोलिसांची झोप
By Admin | Updated: March 27, 2015 21:26 IST2015-03-27T21:17:53+5:302015-03-27T21:26:37+5:30
गुजरातच्या किनारपट्टीलगत आढळलेल्या एका कबूतरने सध्या गुजरात पोलिस व गुप्तचर यंत्रणांची झोप उडवली आहे.

एका कबुतरने उडवली पोलिसांची झोप
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २७ - गुजरातच्या किनारपट्टीलगत आढळलेल्या एका कबूतरने सध्या गुजरात पोलिस व गुप्तचर यंत्रणांची झोप उडवली आहे. या कबुतरवर इलेक्ट्रॉनिक चीप आढळली असून त्याच्यावर अरबी भाषेत काही संदेशही लिहीले होते अशी माहितीही समोर आली आहे. गुजरात पोलिसांनी या घटनेची माहिती दिल्लीतील केंद्रीय गुप्तचर यंत्रणांना दिली आहे.
गुजरातमधील द्वारका जिल्ह्यात एस्सार जेट्टीचे बांधकाम सुरु असून या जेट्टीवरील सुरक्षा रक्षकांना २० मार्च रोजी एक कबूतर आढळला आहे. या कबुतरवर इलेक्ट्रॉनिक चीप लावली होती. कबूतरवर २८७३३ हा आकडा व त्याच्या पंखांवर अरबी भाषेत 'रसूल अल अल्लाह' असे लिहीले होते. हा सर्व प्रकार संशयास्पद वाटल्याने जेट्टीवरील सुरक्षा रक्षकांनी या घटनेची माहिती तटरक्षक दलाला दिली. तटरक्षक दलाने दोन दिवसांपूर्वी याप्रकरणी गुजरात पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून पोलिसांनी कबूतरवरील चिप तपासणीसाठी फॉरेन्सिक प्रयोग शाळेत पाठवली आहे. हे कबूतर उत्तर भारतात आढळतात आणि विदेशात (विशेषतः खाडी देशांमध्ये) या कबूतरांचा वापर संदेश पाठवण्यासाठी होतो. हे कबूतर एखाद्या जहाजामधून उडाले असावे व भरकटून गुजरातच्या किनारपट्टीवर आले असावे असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. पण गुजरात पोलिसांनी या प्रकाराला गांभीर्याने घेत घटनेची माहिती थेट केंद्रीय गुप्तचर यंत्रणांना दिली आहे.