पोलिसांनो ‘स्मार्ट’ बना!
By Admin | Updated: December 1, 2014 00:09 IST2014-12-01T00:09:32+5:302014-12-01T00:09:32+5:30
पोलिसांनी ‘स्मार्ट’ व्हायला हवे़ ज्या देशाची गुप्तचर यंत्रणा सक्षम आहे, त्या देशाला शस्त्रास्त्रांवर अवलंबून राहावे लागत नाही, त्यामुळे,,,,

पोलिसांनो ‘स्मार्ट’ बना!
गुवाहाटी : पोलिसांनी ‘स्मार्ट’ व्हायला हवे़ ज्या देशाची गुप्तचर यंत्रणा सक्षम आहे, त्या देशाला शस्त्रास्त्रांवर अवलंबून राहावे लागत नाही, त्यामुळेच ‘स्मार्ट’ होण्याची गरज आहे, असा कानमंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोलिसांना दिला़
गुप्तचर विभागाद्वारे (आयबी) आयोजित पोलीस महासंचालकांच्या ४९ व्या वार्षिक परिषदेत पंतप्रधान रविवारी बोलत होते़ देशाची सुरक्षा ही तुमच्या शस्त्रागारात किती शस्त्रास्त्रे आहेत आणि किती लोक त्याचा वापर करतात, यावर नाही तर तुमची गुप्तचर यंत्रणा किती सक्षम आहे, यावर ती अवलंबून असते़ तेव्हा स्मार्ट बना, असे मी म्हणेन, असे मोदी म्हणाले़
‘स्मार्ट (एसएमएआरटी) पोलिसिंग’ याचा त्यांना अभिप्रेत असलेला अर्थही मोदींनी सांगितला़ ते म्हणाले, एसएमएआरटी यातील ‘एस’ म्हणजे (स्ट्रिक्ट) कठोर; पण संवेदनशील बना़ एम म्हणजे (मॉडर्न) आधुनिक; पण गतिमान राहा़ ए म्हणजे (अलर्ट) सतर्क; पण उत्तरदायी बना़
आर म्हणजे (रिलायबल) जनतेचा तुमच्यावर विश्वास असू द्या; पण सोबतच तुम्हीही जनतेचा विश्वास संपादन करा आणि टी म्हणजे (टेक्नोसॅव्ही) तंत्रज्ञानाचा जाणकार असा; पण हा वापर दक्ष राहून करा़
३३ हजार पोलीस शहीद
स्वातंत्र्यानंतर देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या ३३ हजार पोलीस कर्मचाऱ्यांना गौरवान्वित करण्यावर त्यांनी भर दिला़ पोलीस कर्मचाऱ्याचे आयुष्य कायम तणावपूर्ण आणि असुरक्षित असते़ अशास्थितीत प्रत्येक पोलिसाच्या कुटुंबाची सुरक्षा, त्यांचे स्थैर्य याची जबाबदारी घेणे सरकारचे काम आहे़, असे मोदी म्हणाले.
सिन्हांच्या डुलक्या सुरूच
पंतप्रधान नरेंद्र मोदी येथे पोलीस महासंचालकांच्या वार्षिक परिषदेत पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत बोलत असताना सीबीआयचे संचालक रणजित सिन्हा डुलक्या घेत होते. शनिवारी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांच्या भाषणाच्या वेळीही ते अशाच डुलक्या घेताना आढळल्याने त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती. (वृत्तसंस्था)