अतिरेक्यांना हिंसाचारापासून दूर करण्यासाठी त्यांच्या कुटुंबांना पोलीसप्रमुखांचे साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 11:52 PM2018-06-30T23:52:48+5:302018-06-30T23:52:57+5:30

तुमच्या मुलांना हिंसाचार सोडून देण्यासाठी समजवा, त्यांना मुख्य प्रवाहात येण्यास सांगा, असे आवाहन जम्मू-काश्मीरचे पोलीसप्रमुख एस. पी. वैद यांनी काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद्यांच्या कुटुंबीयांना केले आहे.

 Police chief's family in order to eliminate terrorists from violence | अतिरेक्यांना हिंसाचारापासून दूर करण्यासाठी त्यांच्या कुटुंबांना पोलीसप्रमुखांचे साकडे

अतिरेक्यांना हिंसाचारापासून दूर करण्यासाठी त्यांच्या कुटुंबांना पोलीसप्रमुखांचे साकडे

श्रीनगर : तुमच्या मुलांना हिंसाचार सोडून देण्यासाठी समजवा, त्यांना मुख्य प्रवाहात येण्यास सांगा, असे आवाहन जम्मू-काश्मीरचे पोलीसप्रमुख एस. पी. वैद यांनी काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद्यांच्या कुटुंबीयांना केले आहे. हिंसाचार सोडल्यास त्यांचे सरकार पुनर्वसन करेल आणि त्यांना सर्व प्रकारची मदतही केली जाईल, असेही वैद यांनी म्हटले आहे.
पोलीसप्रमुख वैद यांनी एका टष्ट्वीटद्वारे हे आवाहन केले आहे. त्यांनी म्हटले की, आज मी कुटुंबीयांना पुन्हा एकदा आवाहन करतो की, त्यांनी चुकीच्या मार्गावर गेलेल्या आपल्या मुलांना हिंसाचाराचा मार्ग सोडून घरी परत येण्यास सांगावे. जे तरुण हिंसाचाराचा, दहशतवादाचा मार्ग सोडून मुख्य प्रवाहात परततील, त्यांना जम्मू-काश्मीरचे पोलीस सर्व प्रकारचे साह्य करतील.
कोणाचीही जीवितहानी पाहणे हे अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी असते. दहशतवादामुळे राज्याचे तर नुकसान होतच आहे, पण त्याहून अधिक त्यांचे स्वत:चे व कुटुंबांचे अधिक नुकसान होत आहे. दहशतवादाकडे वळलेल्या या तरुणांना आपली स्वत:ची कसलीच शाश्वती नाही, हे कुटुंबीयांनी समजावून सांगावे. जम्मू-काश्मीरचे पोलीस त्यांना पुनर्वसनासह सर्व प्रकारचे साह्य करतील, याचे मी वचन देतो, असे पोलीसप्रमुखांनी म्हटले आहे. (वृत्तसंस्था)

शरणागतीही चालेल
पोलीस महासंचालक वैद यांनी यापूर्वीही काश्मिरी अतिरेक्यांच्या कुटुंबीयांना अशाच प्रकारचे आवाहन केले होते. आपल्या मुलांना दहशतवाद सोडून मुख्य प्रवाहात परतायला सांगा, असे ते म्हणाले होते. चकमकी सुरू असतानाही अतिरेक्यांनी शरणागतीचा मार्ग स्वीकारला तरी पोलीस मान्य करतील, असेही त्यांनी जाहीर केले होते. याचा चांगला परिणाम दिसून आला असून, गेल्या वर्षभरात सुमारे डझनभर अतिरेक्यांनी शस्त्रे खाली ठेवली आहेत. कुटुंबीयांच्या आवाहनास प्रतिसाद देऊन अनेक अतिरेकी घरी परतले आहेत.

Web Title:  Police chief's family in order to eliminate terrorists from violence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.