पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदी याचा भाऊ नेहल मोदी याला अमेरिकेत अटक करण्यात आली आहे. ईडी आणि सीबीआयने केलेल्या विनंतीनुसार अमेरिकेतील न्या विभागाने नेहल मोदी याला ४ जुलै रोजी अटक केली आहे. भारतातील मोठ्या बँक घोटाळ्यांपैकी एक असलेल्या पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याचा तपासामध्ये नेहल मोदी याला झालेली अटक हे एक मोठं यश मानलं जात आहे.
नेहल मोदी हा सुद्धा पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील एक आरोपी असून, भारत सरकारने केलेल्या प्रत्यार्पणाच्या औपचारिक विनंतीनुसार नेहल मोदी याला अटक करण्यात आली आहे. तसेच त्याच्या भारताकडे प्रत्यार्पण करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. नेहल मोदीविरोधात असलेल्या दोन मुख्य आरोपांच्या आधारावार प्रत्यार्पणाची कारवाई केली जात आहे.
आपला भाऊ नीरव मोदी याची मदत करताना कोट्यवधी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता लपवल्याचा आणि शेल कंपन्या व परदेशी देवाण घेवाणीच्या माध्यमातून इकडे तिकडे पाठवल्याचा आरोप नेहल मोदीवर आहे. तसेच ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये नेहल मोदी याचं नाव सहआरोपी म्हणून नोंदवण्यात आलं आहे. तसेच त्याच्यावर पुरावे लपवल्याचाही आरोप आहे.
दरम्यान, २०१९ मध्ये इंटरपोलने नेहल मोदीविरोधात रेड कॉर्नर नोटिस बजावली होती. तत्पूर्वी त्याचे भाऊ नीरव मोदी आणि निशाल मोदी यांच्याविरोधातही इंटरपोलची नोटीस प्रसिद्ध झाली होती. नेहल मोदी हा बेल्जियमचा नागरिक असून, त्याचा जन्म अँटवर्प येथे झाला होता.