पंतप्रधान मोदींच्या बचावाचे प्रयत्न !

By Admin | Updated: February 11, 2015 02:04 IST2015-02-11T02:04:43+5:302015-02-11T02:04:43+5:30

मे महिन्यातील लोकसभा निवडणुकीतील अभूतपूर्व यशानंतर महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड येथील सत्तास्थापनेचे आणि जम्मू-काश्मीरमधील

PM's attempt to save Modi! | पंतप्रधान मोदींच्या बचावाचे प्रयत्न !

पंतप्रधान मोदींच्या बचावाचे प्रयत्न !

नवी दिल्ली : मे महिन्यातील लोकसभा निवडणुकीतील अभूतपूर्व यशानंतर महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड येथील सत्तास्थापनेचे आणि जम्मू-काश्मीरमधील आजवरच्या सर्वाधिक जनाधाराचे श्रेय मुक्तकंठाने नरेंद्र मोदींच्या झोळीत टाकून त्यांची ‘लार्जर दॅन लाइफ’ प्रतिमा निर्माण करणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी दिल्ली निवडणुकीतील दारुण पराभवाचे अपश्रेय मोदींच्या अंगाला चिकटू न देण्यासाठी मंगळवारी दिवसभर केविलवाणा प्रयत्न केला.
दिल्ली देशाची राजधानी असल्याने येथे काय होते यावर सर्व जगाचे लक्ष असते, असे म्हणत ‘कमनशिबी’ केजरीवाल यांच्या मागे न जाता ‘नशीबवान’ मोदींच्या मागे दिल्लीकर मतदारांनी जावे, असे आवाहन करत स्वत: मोदी या निवडणुकीच्या प्रचारात उतरले होते. पक्षाध्यक्ष अमित शहा यांनीही दिल्लीचा कल नंतर देशभर प्रतिबिंबित होईल, असे सांगत मोदी करिश्म्याच्या आधारे मतांचा जोगवा मागितला होता. एवढेच नव्हे, दिल्लीत जे काही होईल ते मोदींशी जोडले जाईल याची पक्की खूणगाठ भाजपाने बांधली होती व काहीही झाले तरी दिल्ली सर करायचीच या इराद्याने संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ, सर्व स्वशासित राज्यांचे मुख्यमंत्री व सर्व खासदारांची फौज प्रचारात उतरविली होती. किंबहुना काही विपरीत घडलेच तर मोदींवर ठप्पा येऊ नये यासाठी किरण बेदींना पक्षात घेऊन त्यांना मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार म्हणून ‘प्रोजेक्ट’ करण्याची खेळीही पक्षाने खेळली होती.
मात्र हे सर्व सोयिस्करपणे विसरून, दिल्लीत तोंड लपवायलाही जागा राहिली नाही, हे स्पष्ट होताच भाजपाच्या नेत्या-प्रवक्त्यांमध्ये मोदींवर पांघरूण घालण्याची केविलवाणी चढाओढ सुरू झाली. विविध वाहिन्यांवरील पक्ष प्रवक्त्यांची वक्तव्ये डोळे मिटून ऐकली असता जणू सोनिया-राहुल गांधींवर अपयशाचे खापर न येऊ देण्यासाठी दडपडणारे काँग्रसचे प्रवक्तेच बोलत असल्याचे वाटावे, एवढी ही बतावणी बेमालूम आणि निर्लज्जपणाची होती. बहुधा काय होणार याची आधीच कल्पना असल्याने कोणत्या चेहऱ्याने छोट्या पडद्यावर जायचे याची रंगीत तालीम या भाजपावाल्यांनी आधीच करून ठेवली होती!
स्वत:ही जिंकू न शकलेल्या किरण बेदी म्हणाल्या, हा सामना आमच्या दोघांमध्ये (स्वत: आणि केजरीवाल) होता. खेळात कोणीतरी एक जिंकत असतो, तसे ते जिंकले. पक्ष जिंकला असता तर ते सामूहिक यश ठरले असते, पण अपयश हे एकट्याचे असते. मी ती जबाबदारी पूर्णपणे माझ्यावर घेत आहे. पोलीस दलात होते तेव्हाही अपयश दुसऱ्यावर न टाकता ते मी स्वत:वरच घेत होते.
दुपार व्हायच्या आतच पराभव स्पष्ट झाल्यावर, सदैव हसतमुख असणारे भाजपाचे नेते शाहनवाज हुसैन, तोच भाव कायम ठेवत म्हणाले, दिल्लीतील पराभवाची कारणे अनेक आहेत. वेगवेगळ्या भागांसाठी कारणे वेगळी आहेत. आम्ही निराश झालेलो नाही. आमचे लक्ष्य यापुढील निवडणुका आहे. बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये जिंकण्याची आम्हाला खात्री आहे. पक्षाचे आणखी एक प्रवक्ते जीव्हीएल नरसिंह राव यांनी सांगितले, ही निवडणूक म्हणजे अरविंद केजरीवाल यांच्याविषयीचे सार्वमत होते. निदान दिल्लीच्या मतदारांचा तरी तसा दृष्टिकोन होता. ‘आप’चे आधीचे ४९ दिवसांचे सरकार आणि त्यांनी केलेले काम यावर हे मतदान होते. लोकांनी नक्कीच केजरीवाल यांच्या बाजूने कौल दिला आहे. त्यांना पुन्हा एकदा संधी द्यायला हवी, असे लोकांना वाटते व आम्हाला ते मान्य आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: PM's attempt to save Modi!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.