लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: दहशतवाद अजिबात खपवून घेतला जाणार नाही ही ऑपरेशन सिंदूरने आखून दिलेली लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा नाश अटळ आहे हे लक्षात ठेवा, असा खणखणीत इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी पाकिस्तानला दिला. पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यामुळे भारताच्या एकाही लष्करी तळाचे नुकसान झालेले नाही. यापुढे दुसऱ्या देशाच्या भूमीतून भारतात दहशतवादी कारवाया सुरू राहिल्या तर तुमचे संपूर्ण उच्चाटन केले जाईल, अशी तंबी मोदी यांनी पाकिस्तानला दिली.
आदमपूर हवाई तळावर भारतीय जवानांसमोर केलेल्या भाषणात ते म्हणाले की, अण्वस्त्र हल्ला करण्याची धमकी भारताला देण्यात आली होती. भारतीय लष्कराने त्याला भीक घातली नाही. आम्ही केलेल्या कारवाईनंतर भारतमाता की जय या घोषणेचे महत्व शत्रूना कळले. ही केवळ घोषणा नाही तर तो मातृभूमीसाठी बलिदान देण्याचा जवानांचा संकल्प आहे.
ऑपरेशन सिंदूर हे भारताचे नवे धोरण
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ठाम धोरण, योग्य हेतू, निर्णायक क्षमता ही ऑपरेशन सिंदूरची त्रिसूत्री आहे. ही केवळ लष्करी कारवाई नव्हती तर भारताच्या नव्या विचारसरणीचे ते प्रतिक होते. भारत हा भगवान बुद्धांच्या शांततेचा संदेश देणारे राष्ट्र आहे, पण हा देश गुरु गोविंदसिंग यांच्या शौर्याचेही प्रतिक आहे. पाकिस्तानच्या कोणत्याही कोपऱ्यात दहशतवादी सुरक्षित राहू शकत नाही. पलायनाची संधी न देता आम्ही त्यांचा खात्मा करू. पाकिस्तान आमच्या शस्त्रास्त्रांशी स्पर्धा करू शकत नाही, असे ते म्हणाले.
'ऑपरेशन सिंदूरने भारतातील ऐक्य, आत्मविश्वास वाढविला'
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भारताच्या हवाई दलाने २०-२५ मिनिटांत पाकमधील दहशतवादी तळांवर अचूक निशाणा साधला. ऑपरेशन सिंदूरने भारतातील ऐक्य, आत्मविश्वास आणि लष्कराची ताकद वाढविली आहे. जर पुन्हा दहशतवादी हल्ला झाला, तर भारत आपल्या पद्धतीने चोख प्रत्युत्तर देईल. अण्वस्त्रांनी हल्ला करण्याच्या धमक्यांना आम्ही भीक घालणार नाही. दहशतवादी आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या सरकारांमध्येही आम्ही फरक करणार नाही. आमच्या ड्रोन, क्षेपणास्त्रांच्या आठवणींनी पाकिस्तानची झोप उडविली आहे, असेही ते म्हणाले.
काय आहे आदमपूर हवाई तळावर ?
आदमपूर हा वायूदलाचा दुसऱ्या क्रमांकाचा मोठा हवाई तळ आहे. येथे राफेल आणि मिग-२९ विमाने तैनात आहेत. १९६५ आणि १९७१ मधील भारत-पाकिस्तान युद्धात या तळाने महत्त्वाची भूमिका बजावली होती. तिथे पंतप्रधान मोदी मंगळवारी भेट देणार हे जाहीर केले नव्हते. ते तिथे अनपेक्षितपणे पोहोचले तेव्हा हवाई दलाच्या जवानांनी 'भारतमाता की जय'च्या घोषणा दिल्या. मोदी यांनी वेस्टर्न एअर कमांडचे त्रिशूल चिन्ह असलेली टोपी परिधान केली होती. ऑपरेशन सिंदूरनंतर जवानांशी संवाद साधला.