Congress On Manipur Violence: भारताच्या ईशान्येकडील मणिपूर राज्य गेल्या वर्षभरापासून हिंसाचाराच्या आगीत जळत आहे. याबाबत मुख्यमंत्री एन बीरेन सिंग यांनी आज (31 डिसेंबर 2024) पत्रकार परिषदेत माफी मागितली आणि लवकरच राज्यात शांतता प्रस्थापित करण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, आता यावरुन काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. 'नरेंद्र मोदी जगभर फिरतात, पण मणिपूरला जाऊन तेथील लोकांची माफी का मागत नाहीत?' असा सवाल काँग्रेसने केला.
काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी पंतप्रधानांवर मणिपूरकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी अद्याप मणिपूरला का गेले नाही, हे तिथल्या लोकांना समजत नाहीये. पंतप्रधान मणिपूरला जाऊन का माफी मागू शकत नाहीत? ते देश आणि जगाच्या कानाकोपऱ्यात फिरतात, मात्र 4 मे 2023 पासून मणिपूरचा दौरा ट देणे जाणूनबुजून टाळला'
'मणिपूरचे मुख्यमंत्री 19 महिने काहीही बोलले नाहीत. शेकडो लोक मारले गेले आणि हजारो विस्थापित झाले. मुख्यमंत्री आज यावर बोलले, पण पंतप्रधान अद्याप गप्प आहेत. मणिपूरचे अपयश पंतप्रधानांचे आहे. तुम्ही फक्त मदत शिबिरे उभारुन मणिपूरच्या जनतेवर उपकार केला नाही, ही तुमची जबाबदारी आहे.
मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी मागितली माफीमणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंग यांनी आज राज्यातील हिंसाचाराबद्दल माफी मागितली आणि सर्व समुदायांना भूतकाळातील चुका विसरुन शांततापूर्ण आणि समृद्ध राज्यात एकत्र राहण्याचे आवाहन केले. हे संपूर्ण वर्ष खूप दुर्दैवी आहे. आजपर्यंत जे काही घडले, त्याबद्दल मला खेद वाटतो आणि मी सर्वांची माफी मागू इच्छितो. 2025 मध्ये राज्यातील परिस्थिती सामान्य होईल आणि शांतता परत येईल, अशी मला आशा आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी आज दिली.