Kolkata Hotel Fire: कोलकाता येथील एका हॉटेलमध्ये भीषण आग लागल्यामुळे १४ जणांचा होरपळून मृत्यू झाला. मंगळवारी रात्री कोलकात्यातली अत्यंत गजबलेल्या बारा बाजार परिसरातील मच्छुआ फल मंडीजवळील श्रुतुराज हॉटेलमध्ये आग ही लागली. आग लागल्यानंतर अग्निशमन दलाची गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी आग आटोक्यात आणण्यात आली. मात्र तोपर्यंत बराच उशीर झाला होता. हॉटेलमधील १४ जणांना या आगीत आपला जीव गमवावा लागला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर दुःख व्यक्त करत मृतांच्या नातेवाईकांना मदत जाहीर केली आहे.
मंगळवारी रात्री कोलकाता येथील श्रुतुराज हॉटेलमध्ये आग लागली. आग इतकी भीषण होती की त्यात १४ जणांचा मृत्यू झाला. अनेकांनी जीव वाचवण्यासाठी हॉटेलच्या इमारतीवरून उड्या मारल्या. श्रुतुराज हॉटेलमध्ये आगीची घटना रात्री ८:१५ वाजता घडली. आग विझवल्यानंतर १४ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. बचाव पथकाने अनेकांचा जीव वाचवत आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेनंतर तपासासाठी एक विशेष पथकही तयार करण्यात आले आहे.
"कोलकाता येथील आग दुर्घटनेत झालेल्या मृत्युंमुळे मला दु:ख झाले आहे. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्याबद्दल संवेदना व्यक्त करतो. जखमी लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करतो. प्रत्येक मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी २ लाख रुपयांची मदत दिली जाईल. जखमींना प्रत्येकी ५०,००० रुपये दिले जातील," असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही कोलकाता आगीच्या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या लोकांबद्दल शोक व्यक्त केला. "कोलकाता हॉटेल आगीच्या घटनेत लोकांच्या मृत्यूची दुःखद बातमी अत्यंत अस्वस्थ करणारी आणि वेदनादायक आहे. शोकाकुल कुटुंबीयांबद्दल माझ्या मनापासून सहानुभूती आहे. जखमी लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करते," असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं.