PM Modi on Jagdeep Dhankhar Resignation: संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु असतानाच उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. प्रकृतीच्या कारणास्तव आपण राजीनामा देत असल्याचं जगदीप धनखड यांनी म्हटलं. जगदीप धनखड यांनी अचानक घेतलेल्या राजीनाम्याच्या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. विरोधी पक्षाने जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याबाबत आश्चर्य व्यक्त केलं. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही धनखड यांच्या राजीनाम्यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
सोमवारी संध्याकाळी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लिहिलेल्या एका पत्रात आरोग्यासंबंधी कारणे आणि उपचार घेण्याच्या सल्ल्याची माहिती देत आपल्या पदाचा राजीनामा दिला. या पत्रात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचेही सहकार्य केल्याबद्दल आभार मानले होते. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
"श्री जगदीप धनखड जी यांना भारताचे उपराष्ट्रपती पदासह अनेक भूमिकांमध्ये देशाची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. मी त्यांच्या आरोग्यासाठी शुभेच्छा देतो," असं पंतप्रधान मोदींनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं.
जगदीप धनखड काय म्हणाले?
"आरोग्याला प्राधान्य आणि वैद्यकीय सल्ल्याचे पालन करत मी भारताच्या उपराष्ट्रापती पदाचा संविधानाच्या ६७ (अ) कलमानुसार तात्काळ प्रभावाने राजीनामा देत आहे. संसदेतील सर्व सदस्यांकडून जे प्रेम, विश्वास आणि सन्मान मिळाला तो माझ्या आठवणीत राहिल. मी या महान लोकशाहीसाठी आभारी आहे, मला या महान लोकशाहीत उपराष्ट्रपती म्हणून मिळालेले अनुभव आणि ज्ञान हे अत्यंत मौल्यवान होते. ही माझ्यासाठी सौभाग्य आणि समाधानाची गोष्ट आहे की मी भारताची अभूतपूर्व आर्थिक प्रगती आणि वेगाने होणारा विकास पाहिला आणि त्यामध्ये माझं योगदान दिलं," असं जगदीप धनखड यांनी राष्ट्रपतींना लिहीलेल्या पत्रात म्हटलं आहे.